औरंगाबाद- आषाढी एकादशी निमित्त येथील हर्सूल कारागृहात कैद्यांनी देखील पांडुरंगाची पालखी काढली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. पांडुरंगाच्या जयघोषाने कारागृहातील वातावरण भक्तिमय झाल्याचे पाहायला मिळाले.
आषाढी एकादशी निमित्त अनेक छोट्या पालख्या या पंढरपूरच्या दिशेने निघतात. मात्र, आपल्या एका चुकीने कारागृहात जावे लागणाऱ्या कैद्यांना पालखीत सहभाग घेता यावा. पांडुरंगाची भक्ती करता यावी, त्यांना देखील भजन, कीर्तन करून नामस्मरण करता यावे, यासाठी कारागृह प्रशासनाने पालखी सोहळा साजरा करण्याची परवानगी दिली होती.
औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात आपल्या चुकीची शिक्षा भोगणाऱ्या 450 कैद्यांनी टाळ, मृदुंगाच्या गजरात आषाढी एकादशी साजरी केली. टाळ, मृदंग वाजवत कैद्यांनी पालखी सोहळा साजरा केला. कैदी असला तरी त्याला वारकरी संप्रदायाची परंपरा जपता यावी, यासाठी हा उपक्रम राबवला असून अशा उपक्रमांमुळे गुन्हेगारी विचार त्यांच्या डोक्यातून जाऊ शकतात, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.