औरंगाबाद : चुकीच्या रेल्वेचे तिकीट काढल्याने औरंगाबादला पोहोचलेल्या एका तरुणीला रेल्वे पोलिसांनी सुखरूपपणे पुन्हा बिहारच्या दिशेने रवाना केले. या युवतीच्या मदतीसाठी सरसावलेल्या रेल्वे पोलीस व अधिकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, नवी दिल्लीहून बिहारच्या पूर्णियाला जाण्यासाठी निघालेली एक 20 वर्षीय तरूणी चूकीच्या रेल्वेत बसल्याने औरंगाबादमध्ये पोहोचली. दिल्ली ते पूर्णिया (बिहार) ऐवजी चुकून नवी दिल्ली ते पूर्णा असे तिकीट काढून सचखंड एक्स्प्रेसने ही तरूणी रविवारी सकाळी 9.50 वाजता औरंगाबादला पोहोचली. रेल्वे जात असलेल्या मार्गावर बिहारमधील औरंगाबाद रेल्वे स्टेशन येत नाही, ही बाब युवतीच्या लक्षात आली. परंतु तोपर्यंत ही रेल्वे सेलू रेल्वे स्टेशनवर पोहोचली. ही माहिती रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना रेल्वे सेना गोल्डन ग्रुप सदस्य आनंद बाहेती व प्रवीण माणकेश्वर यांनी दिली. तेव्हा तरुणीस घरी पाठविण्याचे नियोजन त्यांनी केले. रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अरविंदकुमार शर्मा, स्टेशन व्यवस्थापक एल. के. जाखडे, चंदूप्रधान आदींनी या युवतीला मदत केली.