औरंगाबाद - मुंबईतून पत्नीला घेऊन जाण्यासाठी आलेल्या जावयाचा सासरायच्या मंडळींशी वाद झाला. दरम्यान, रागाच्या भरात आत्महत्या कशी करावी याची माहिती युट्यूबवर घेत मंगळवारी (दि. 23 मार्च) पहाटेच्या सुमारास सासऱ्याच्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना हिमायत बाग परिसरात घडली आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
सचिन प्रकाश अहिरे (वय 26 वर्षे, रा.कल्याण, मुंबई), असे आत्महत्या करणाऱ्या जावयाचे नाव आहे. मृत सचिनची पत्नी काही दिवसांपूर्वी माहेरी आली होती. यामुळे पत्नी व मुलांना मुंबईला घेऊन जाण्यासाठी सचिन शहरातील हिमायतबाग परिसरात आला होता. यावेळी काही कारणावरून सचिन व सासरकडील मंडळीमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने फक्त मुलांना घेऊन जाणार होता. यावेळी सासरकडील मंडळींनी त्याला मुलांनाही घेऊन जा, असे सांगितले. काही वेळाने वाद मिटला. दरम्यान, रात्री सचिन झोपण्यासाठी खोलीत गेला. घरातील सर्व सदस्य झोपी गेले. सचिनने रागाच्या भरात रात्री आत्महत्या कशी करावी याचे युट्यूबवर व्हिडिओ बघितले. पाहिलेल्या विडिओतून सचिनने मंगळवार पहाटेच्या सुमारास ओढणीच्या साहायाने गळफास घेतला. सकाळी ही बाब सासरच्या मंडळींच्या लक्षात येताच सचिनला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा - वृद्ध दाम्पत्याचे कुजलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह, आठ दिवसांनी घटना समोर