औरंगाबाद - शहरातील चिकलठाणा एमआयडीसीमध्ये केबलचे काम सुरू असताना मजुर आणि क्रेन मालक यांच्यात वाद झाला होता. त्यावरून दुसरे क्रेन मागविल्याच्या रागातून एका मजुराला डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान दोन्ही अपहरणकर्त्यांना सिडको पोलिसांनी अटक केली आहे. सुरेश विश्वनाथ कांबळे असे मजुराचे नाव आहे.
नवनाथ महादु कुटे (वय ३४, रा. मोरहिरा, चौक) आणि लक्ष्मण बाबुराव राऊतराय (वय ३९, रा. भावसिंगपुरा) अशी आरोपींची नावे आहेत.
मालक संदीप नरोडे यांनी खोदकाम करुन केबल टाकण्याचे कंत्राट घेतलेले आहे. त्यांचा मजूर सुरेश विश्वनाथ कांबळे ( वय २८) हा केबल टाकण्यासाठी गुरवारी दि. २० रोजी पुण्याहून आला होता.
,सिडको एन-११ मधील राष्ट्रवादी भवनाच्या शेजारी काम सुरू होते. यावेळी सुरेश कांबळे आणि तेथील क्रेन मालक नवनाथ कुटे यांच्यामध्ये वाद झाला. त्यावरुन सुरेशने मालक नरोडेशी संपर्क साधून दुसरे क्रेन मागविले.
या क्रेनच्या सहाय्याने केबल ओढण्याचे काम सुरू असताना नवनाथ कुटे आणि राऊतरायने सुरेशला दुसरे क्रेन का मागवले म्हणत वाद घातला. तसेच त्याला शिवीगाळ करुन मारहाण केली.
याचवेळी मारुती गवळेला बोलवा त्याला जीवे मारु, असे म्हणत सुरेशला बळजबरी टेम्पोत बसवून नारेगावातील गोडाऊनवर नेऊन रात्रभर बारा तास डांबून ठेवले. जर पोलिसात तक्रार केली तर पुन्हा मारहाण करु, असे धमकावत २१ जुन रोजी सकाळी सुरेशला सोडून देण्यात आले.
या प्रकारानंतर सुरेशने थेट सिडको पोलीस ठाणे गाठत तक्रार केली आहे. त्यावरुन पोलिसांनी दोघांना पकडले असून याप्रकरणी पुढील तपास जमादार नरसिंग पवार करत आहेत.