औरंगाबाद- चोरी झाली आणि परिसरामध्ये शिकलकरी समाज राहत असेल, तर त्या समाजाच्या वस्तीवर पोलीस कारवाई करतात. त्यांचा पोलिसांकडून छळ करण्यात येतो. त्यांच्यावर अन्याय होतो. हे तातडीने बंद झाले पाहिजे, शिकलकरी समाजाकडे चुकीच्या नजरेने पाहणे बंद करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. सुभेदारी विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
शिकलकरी समाजाच्या मेळाव्यानिमित्त प्रकाश आंबेडकर शहरात आले होते. यावेळी त्यांनी सुभेदारी विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आंबेडकर म्हणाले की, शिकलकरी समाज हा स्वातंत्र्य लढयापासून लढाऊ समाज म्हणून ओळखला जातो. परंतु हा समाज राजकीय प्रवाहापासून वंचित असून, या समाजाला राजकीय आणि सामाजिक प्रवाहात आणण्याचे काम वंचित बहुजन आघाडीने केले आहे. या समाजाला शासनाच्या कुठल्याही योजनांचा लाभ मिळत नाही. आजही त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही. ते लोखंडी शस्त्रे बनवण्याचे काम करतात. त्यामधून मिळणाऱ्या तुटपुंज्या मिळकतीवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे अशा भटक्या विमुक्त समाजाला शासनाने जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आंबेडकर यांनी यावेळी केली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये वंचितने किती जागा जिंकल्या हे 21 तारखेला जाहीर करणार
राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. आम्हीच सर्वाधिक जागा जिंकल्या असल्याचा दावा राज्यातील प्रमुख पक्षांकडून केला जात आहे. मात्र मी असा कोणताही दावा करणार नाही. वंचित बहुजन आघाडीने ग्रामपंचायतीमध्ये कीती जागा जिंकल्या हे मी 21 तारखेला जाहीर करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.