औरंगाबाद - चोरट्यांनी दुचाकीस्वाराला अडवून चाकूहल्ला करून त्यांच्याकडील पाच लाख रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री सिल्लोड शहरातील भराडी रस्त्यावर घडली, घटनेनंतर पोलिसांनी जिल्हाभर नाकाबंदी केली असून हल्लेखोर चोरांचा कसून शोध घेतला जात आहे.
भिकन निळोबा जाधव (रा. जयभवानी नगर, सिल्लोड) असे चोरट्यांच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर लक्ष्मण पुंजाजी मोरे जखमी आहेत.
सिल्लोड येथे जैस्वाल यांचे वाईन शॉप आहे. तेथे हे दोघेही कर्मचारी म्हणून काम करीत होते. दोघेही रात्री शॉप बंद करून दिवसभरात जमा झालेली रक्कम मालकालाकडे जमा करण्यासाठी घेऊन जात होते. दरम्यान त्यांच्यावर पाळत ठेवून चोरट्यांनी ही लूट केली. जाधव यांच्याकडे पाच लाखांपेक्षा अधिक रक्कम होती. हल्ल्यात जखमी झालेले मोरे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या प्रकरणी सिल्लोड पोलीस ठाण्यात हत्या व लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी जिल्हाभर नाकाबंदी करण्यात आली आहे.