औरंगाबाद - शहरातील भावसिंगपुरा भागात ३ वर्षीय चिमुरड्याच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. चिमुरडा अंगणात खेळत असताना सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी छावणी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. चेतन अनिल मोरे वय-3 वर्ष असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
भुसावळजवळील गंगापुरी गावातील रहिवाशी असलेले मोरे कुटुंब औरंगाबादेतील विटाभट्टीवर काम करण्यासाठी आले आहे. आज सकाळी मृत चिमुरड्याची आई घरातील काम करत होती, तर वडील अंघोळ करत होते. त्यावेळी ३ वर्षीय चेतन घरासमोरील अंगणात खेळत होता. त्या ठिकाणी वीटभट्टीवर आलेला एक ट्रॅकटर उभा होता. चालक मुनिर खान इमाम खान हा बाजूलाच मित्रासह बोलत उभा होता. काही वेळाने चालक मुनिर हा स्टेअरिंगवर बसला आणि मित्रही शेजारी बसला. दोघांच्या गप्पा रंगल्या. तेवढ्यातच ट्रॅक्टरचे समोरील चाक चिमुकल्या चेतनच्या अंगावरून गेले. तसेच ट्रॅक्टरचे मोठे चाक डोक्यावरून गेल्याने चेतनचा जागीच मृत्यू झाला.
चालक आणि मित्र दोघे बोलण्यात एवढे मग्न होते की आपल्या वाहनाखाली एक चिमुकला ठार झाला याची कल्पनाही त्यांना नव्हती. आई-वडिलांनी हंबरडा फोडल्यानंतर काही अंतरावर गेलेल्या चालकाला चाकाखाली चिमुरडा चिरडला गेल्याचे समजले. आई, वडील आणि भट्टीवरील इतर कामगारांनी चेतनला घाटी रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी छावणी पोलीस ठण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी चालक मुनिरला ताब्यात घेऊन ट्रॅक्टर जप्त केले आहे.
सहा महिन्यानंतर आज जाणार होते मूळगावी -
भुसावळ जवळील गंगापुरी या गावातील रहिवाशी असलेला मोरे कुटुंबातील ८ ते १० जण रोजगारासाठी औरंगाबाद येथील भावसिंगपुरा येथील वीटभट्टीवर नोव्हेंबर महिन्यात आले होते. सहा महिने परगावी काम करून मिळालेले पैसै घेऊन घरी जाणार असल्याचा आनंद सर्व मोरे कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर होता. आज सकाळी १० वाजता सर्वजण मूळगाव गंगापुरी येथे जाणार होते. त्यासाठी सकाळपासूनच वीटभट्टीवर तयारी सुरू होती. मात्र, गावी जाण्याच्या दोन तासापूर्वीच चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आणि आनंदाचे वातावरण दुःखात बदलले.
मायेचा हात फिरविला...अन् तो शेवटचा ठरला -
चेतन बाहेर खेळत असताना मस्ती करत होता. काम करणाऱ्या आईने त्यास खोडसाळपणा करू नको, असे म्हणत गालगुच्चा घेतला. तसेच आपण आता लावकर घरी जाऊ. तू सतावू नकोस. मला काम करू दे, असे म्हणत मायेचा हात डोक्यावरून फिरवला. मात्र, तो शेवटचा ठरला.