औरंगाबाद - शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. यामुळे पुढील तीन दिवसांसाठी शहर लॉकडाऊन करण्यात आला आहे. 18 मे पर्यंत शहरात अत्यावश्यक सेवा वगळता, सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाची रुग्णांची संख्या साडे-आठशेच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 72 तासांचा सक्तीचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
मे महिन्यात कोरोनाला आळा घालण्यासाठी एकदिवस आड बाजार उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या काळात सुरुवातीला सकाळी 6 ते 11 या काळात व्यवहार करण्यास मुभा देण्यात आली होती. मात्र वाढणारी वर्दळ पाहता ही वेळ दोन तासांनी वाढवण्यात आली होती. मात्र या काळात लोकांची गर्दी दिवसंदिवस वाढत चालली होती. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवणे शक्य होत नसल्याने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी 72 तासांचा सक्तीचा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
केंद्रेकर यांच्या आदेशानुसार आज (१५ मे शुक्रवार) मध्यरात्री पासून ते 17 तारखेच्या रात्री पर्यंत बाजार पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या काळात वैद्यकीय सेवा आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील, इतकेच नाही तर या काळात अनावश्यक फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आले आहेत.
हेही वाचा - अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या मदतीमुळे लघु आणि मध्यम उद्योगांना उभारी मिळेल - राम भोगले
हेही वाचा - औरंगाबादेत एमआयएम नगरसेवकांमध्ये मारामारी, तीन जण जखमी