हैदराबाद : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं (DRDO) मंगळवारी एक नवा विक्रम केलाय. ओडिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणीवरून प्रथमच जमिनीवर हल्ला करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. हे जहाजविरोधी बॅलिस्टिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. त्याची रेंज एक हजार किलोमीटरपर्यंत आहे. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, क्षेपणास्त्राच्या सर्व उपप्रणालींनी चांगली कामगिरी केलीय. या यशाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही डीआरडीओचे अभिनंदन केलं आहे.
प्रगत सॉफ्टवेअरनं सुसज्ज क्षेपणास्त्र : संरक्षण मंत्रालयानं सांगितलं की, क्षेपणास्त्राने पॉइंट नेव्हिगेशनचा वापर करून आपल्या मार्गाचा अवलंब केलाय. वेगवेगळ्या उंचीवर आणि वेगाने उड्डाण करताना आपली क्षमता क्षेपणास्त्रानं प्रदर्शित केलीय. या क्षेपणास्त्रात अत्याधुनिक एव्हीओनिक्स आणि सॉफ्टवेअरही आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने ओडिशातील एकात्मिक चाचणी श्रेणी चांदीपूर येथून मोबाईल आर्टिक्युलेटेड लाँचरमधून लांब पल्ल्याच्या लँड अटॅक क्रूझ क्षेपणास्त्राची (LRLACM) पहिली चाचणी घेतली.
या कंपन्यांनी विकसित केलं क्षेपणास्त्र : रडार, इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टीम आणि टेलीमेट्री यांसारख्या अनेक श्रेणी सेन्सर्सद्वारे क्षेपणास्त्राच्या कामगिरीचं परीक्षण केलं गेलं. चाचणीवेळी डीआरडीओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि तिन्ही लष्कराचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हे क्षेपणास्त्र बेंगळुरूच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, DRDO आणि इतर भारतीय उद्योगांच्या सहकार्यानं विकसित केलं आहे. हैदराबादस्थित भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि बंगळुरूची भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपन्यानी देखील या प्रकल्पात भाग घेतलाय.
क्षेपणास्त्र डागता जहाजावरूनही येणार : हे क्षेपणास्त्र मोबाईल आर्टिक्युलेटेड लाँचर वापरून जमिनीवरून आणि युनिव्हर्सल व्हर्टिकल लाँच मॉड्यूल सिस्टमद्वारे फ्रंटलाइन जहाजांना जोडलं जाऊ शकतं. क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, सशस्त्र दल आणि उद्योगसमूहाचे अभिनंदन केलंय. यामुळं भविष्यात स्वदेशी क्रूझ क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांचा मार्ग मोकळा होईल, असं ते म्हणाले. हा संरक्षण अधिग्रहण परिषदेनं LRLLACM मंजूर केलेला मिशन मोड प्रकल्प आहे.
'हे' वाचलंत का :