मुंबई : अजित पवार हेच आगामी निवडणूक निकालानंतर किंगमेकर होणार आहेत. या निवडणुकीत त्यांचा स्ट्राइक रेट सर्वात जास्त राहणार आहे. अजित पवार किंगमेकर होतील आणि त्यानंतर आम्ही आमच्या अटी आणि शर्थींवर सरकारमध्ये सहभागी होऊ, असा विश्वास माजी मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केलाय. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. किमान समान कार्यक्रमाशिवाय आम्ही कोणत्याही सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केलंय. अल्पसंख्याक समाजाला तिकीट वाटपात संधी देण्याच्या मागणीकडे काँग्रेसने दुर्लक्ष केलंय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनीदेखील अल्पसंख्याकांना उमेदवारीमध्ये जास्त प्रतिनिधित्व दिलं नाही. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 10 टक्क्यांच्या आसपास अल्पसंख्याक समाजाच्या उमेदवारांना रिंगणात उतरवलंय. त्यामुळे अल्पसंख्याक समाज आमच्या पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे, असा दावा त्यांनी केलाय.
पवारांनी 1978 मध्ये पुलोद सरकार स्थापन केलं : अजित पवार भाजपा सोबत गेले, असा आरोप करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली. शरद पवार 1978 मध्ये पुलोद सरकार स्थापन करताना भाजपाच्या पूर्वसूरींसोबतच होते. याचा अर्थ त्यांनी विचारधारा सोडली नव्हती, ती राजकीय तडजोड होती. त्याचप्रमाणे अजित पवारांनीदेखील विचारधारा सोडलेली नाही. या देशात प्रत्येक पक्षाने राजकीय तडजोड करून निवडणुका लढवलेल्या आहेत. त्यामुळे केवळ अजित पवारांना लक्ष्य करणे पूर्णतः चुकीचे असल्याचे मलिक म्हणालेत. भाजपासोबत जाण्यात आमचा कोणताही वैचारिक गोंधळ नाही, असे अजित पवारांनी यापूर्वीच स्पष्ट केल्याकडे नवाब मलिकांनी लक्ष वेधलंय.
जामीन रद्द करण्याची याचिका हितचिंतकांकडून : माझ्या विरोधातील केस संदर्भात बोलण्यास न्यायालयाने मनाई केलीय. मात्र, इतर विषयांवर बोलण्यास न्यायालयाची मनाई नाही, असे त्यांनी सांगितलं. राजकीय व्यक्ती असल्याने आणि निवडणुकीच्या रिंगणात असल्याने माझे विचार मांडण्यास न्यायालयाने कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. गेल्या काही दिवसांमध्ये मी विविध विषयांवर जे बोलतोय, माझे मतप्रदर्शन करतोय, ते माझ्या काही हितचिंतकांना खटकले असावे, मी राजकारणातून संपलो, असा काहींचा गोड गैरसमज झाला होता. मात्र या निवडणुकीत मी स्वतः एका मतदारसंघातून आणि माझी मुलगी दुसऱ्या मतदारसंघातून, असे आम्ही दोघे निवडणुकीच्या रिंगणात आहोत आणि आम्हाला मतदारांचा उदंड अन् उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे माझ्यावर जास्त प्रेम करणाऱ्यांना माझा जामीन रद्द व्हावा, अशी इच्छा झाली असावी आणि त्यातून ही याचिका दाखल करण्यात आली असावी, असा टोला नवाब मलिक यांनी लगावलाय. न्यायालयात माझ्या जामिनाविरोधात याचिका दाखल करण्यात आली असून, या प्रकरणाची सुनावणी होईल, तेव्हा आपल्याकडून त्यावर उत्तर दाखल केले जाईल, असे मलिकांनी स्पष्ट केलंय. या माध्यमातून मला रोखण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र अशा प्रकारांना मी घाबरणार नाही. तुरुंगात जाण्यापासून आम्ही घाबरत नाही. आमच्या म्हणण्यावर आम्ही नेहमी ठाम राहतो. मी निवडणुकीच्या रिंगणात असल्याने तसेच मी माझे विचार मांडत असल्याने अनेकांना अडचणी निर्माण झाल्यात. त्यामुळे माझा जामीन रद्द करण्याचे कटकारस्थान सुरू झालंय, असा आरोप त्यांनी केलाय.
पवार कुटुंब एकत्र राहावे ही कार्यकर्त्यांची इच्छा : पवार कुटुंब एकसंघ राहिले पाहिजे ही बारामती आणि महाराष्ट्रातील लोकांची तसेच दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र याचा निर्णय दोन्ही नेत्यांनी घेणे आवश्यक आहे. जनता याचा निर्णय घेऊ शकत नाही. बारामतीच्या जनतेने लोकसभेला साहेब आणि विधानसभेला दादा असा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत दादा भरघोस मतांनी विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या परिवारातील व्यक्ती आपापली बाजू मांडत आहेत, मात्र एकच कुटुंब आहे, त्यामुळे आज ना उद्या ते एकत्र येतील, असा दावा त्यांनी केलाय. कार्यकर्त्यांची देखील तशीच इच्छा आहे, मात्र राजकारणात काय होईल सांगता येत नाही, असे मलिक यांनी स्पष्ट केलंय.
हेही वाचा :