औरंगाबाद : पतसंस्थेत 200 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी अध्यक्ष, संचालक मंडळासह 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत हा घोटाळा झाला असून सिडको ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात एक गुन्हा 91 कोटींचा असून दुसरा गुन्हा 101 कोटींचा आहे. सहकार विभागाच्या लेखा परीक्षण अहवालात कर्ज प्रकरणातील हा घोटाळा समोर आला आहे.
शहानिशा न करता दिले कर्ज : बँकेत कर्जवाटप करत असताना कुठलीही शहानिशा न करता कर्ज मंजूर केल्याचा ठपका अध्यक्ष अंबादास मानकापे, त्यांचा मुलगा अनिल मानकापे आणि संचालक मंडळ यांच्यावर करण्यात आला आहे. कर्ज प्रकरणातील अपूर्ण स्थितीतले अर्ज स्वीकारुन कर्ज वाटपाचे निकषाचे जाणीवपूर्वक उल्लंघन केले. विनातारण व कमी तारण स्वीकारुन गंभीर त्रुटी असलेल्या अर्जाच्या आधारे कर्ज वितरीत केले. वितरीत केलेल्या कर्जास संचालक मंडळ सभेने देखील गंभीर त्रुटीकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करुन, ठेवीदारांनी संस्थेत ठेवलेल्या ठेव रकमेतून मोठ्या प्रमाणात कर्जाचे वितरण करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता दोन वेगवेगळे गुन्हे सिडको पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.
बनावट तारण ठेवून कर्ज : बँकेतून कर्ज देत असताना त्यासाठी काही निकष लावले जातात. मात्र आदर्श नागरिक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळांनी काही विशिष्ट ठेवीदारांना नियमबाह्य कर्ज वाटप केले. तसेच आदर्श ग्रुप अंतर्गत 15 संस्थांना कर्ज वाटप केले गेले. त्याशिवाय नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना कर्ज वाटप केले. यासाठी काहींना विनातारण तर, काहींना विना जामीनदार कर्ज दिले आहे. तर काहीजणांनी बनावट तारण आणि सभासद उभे करून कर्ज घेतले आहे. यावेळी संचालक मंडळातील कोणीही आक्षेप नोंदवलेला नाही. 2016 ते 2019 या काळात 103 कोटी 16 लाख रुपयांचा कर्जवाटप घोटाळा तर 2018 ते 2023 पर्यंत 99 कोटी सात लाख रुपयांचा घोटाळा समोर आला आहे. यात अनेक प्रकरणे अशी आहेत की, ज्यामध्ये कागदपत्र अपूर्ण आहेत. त्यामुळे दोन वेगवेगळे गुन्हे दखल करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त चीलवंत नांदेडकर यांनी दिली.
ठेवीदारांनी केली होती तक्रार : एप्रिल 2003 मध्ये आदर्श ग्रुप अंतर्गत आदर्श नागरी पतसंस्थेची सुरुवात करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून बँकेत गैरव्यवहार होत असल्याची तक्रार ठेवीदारांनी दिली होती. इतकच नाही तर बँकेसमोर उपोषण देखील सुरू केले होते, यात ठेवीदार आणि बँक व्यवस्थापक कर्मचारी यांच्यात वादही निर्माण झाले होते. सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशावरून लेखापरीक्षक धनंजय चव्हाण यांनी अहवाल तयार केला, जून 2023 मध्ये तो अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आला आणि त्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली.
या संचालक मंडळावर गुन्हा दाखल : सिडको पोलिसात दाखल झालेल्या पुण्यातील संस्थेचे अध्यक्ष अंबादास मानकापे, महेंद्र देशमुख, अशोक काकडे, काकासाहेब काकडे, भाऊसाहेब मोगल, त्र्यंबक पठाडे, रामसिंग जाधव, गणेश दौलतपुरे, ललिता मुन, सपना संजय, प्रेमीला जयस्वाल, मुख्य व्यवस्थापक देविदास अधाने, पंडित कपटे, अनिल मानकापे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -