औरंगाबाद - चिकलठाणा भागातील गॅरेज आणि दुकानांना मध्यरात्री अचानक आग लागून ७ ते ८ दुकाने जळून खाक झाली आहेत. यावेळी गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या चारचाकी आणि दुचाकीसुद्धा जळून खाक झाल्या. ही घटना चिकलठाणा आठवडी बाजार परिसरात घडली आहे.
नागरिकांनी रात्री अग्निशमन दलाच्या जवनांसोबत आग विझवण्याचे काम केले. सुदैवाने ही आग लवकर आटोक्यात आली. अन्यथा बाजूलाच असलेली आणखी दुकाने पेटण्याची शक्यता होती.
चिखलठाणा बाजारासमोर असलेल्या दुकानांना मध्यरात्री अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग एवढी भीषण होती की गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेली २० चारचाकी वाहने जळून खाक झाली.
आग लागलेल्या ठिकाणी असलेल्या ८ गॅरेजला याचा फटका बसला. गॅरेजमध्ये जवळपास ५० चारचाकी आणि दुचाकी वाहने होती. ५० वाहनांपैकी २० वाहने जाळून खाक झाली असून इतर वाहनांनादेखील त्याचा फटका बसला आहे. या आगीत लाखोंरूपयांचे नुकसान झाले.