औरंगाबाद - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. आज सकाळी 17 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 495 वर पोहचली आहे. रूग्णसंख्येचा वाढता वेग लक्षात घेता आज दिवसभरात कोरोनाबधितांची संख्या 500 पार जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये संजयनगर - 6, कटकट गेट - 2, बाबर कॉलनी - 4, असेफीया कॉलनी - 1, भवानीनगर - 2, रामनगर - 1, सिल्क मिल - 1 येथील रुग्णांचा समावेश आहे. यात 10 महिला व 7 पुरुषांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कुलकर्णी यांनी दिली.
शुक्रवारी औरंगाबादमध्ये दिवसभरात 99 रुग्णांची भर पडली. त्यामुळे बधितांची संख्या अचानक जास्त झाली आहे. भारत बटालियनच्या 72 जणांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. काही जवानांचे अहवाल येणे बाकी असून त्यांचे अहवाल आल्यानंतर आणखी चित्र स्पष्ट होईल.