औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील देवळाना येथील ग्रामीण भागात असलेल्या कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यात पॉझिटिव्ह रुग्णात आई व दोन वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १९ व इतर एक असे एकूण २० जणांचे स्वॅब तपासणीकरिता पाठविले होते. त्यातील १७ जणांचे आहवाल निगेटिव्ह आले असून अजून संपर्कात आलेल्या चार जणांचे स्वॅब तपासणीकरिता पाठविण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय आधिकारी डॉ. प्रवीण पवार यांनी दिली आहे. सतरा जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने तालुक्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला असून ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील नागरिक सतर्क झाले आहे.
उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहसीलदार संजय वारकड, गटविकास अधिकारी डॉ.कृष्णा वेणीकर यांनी देवळांना गावाला भेट देऊन कोरोनाविषयी सविस्तर माहिती घेतली तर तहसीलदार संजय वारकड यांनी देवळाना गाव कंटेनमेंट झोन जाहीर करून संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण करण्यात आले.
गावात जीवनावश्यक वस्तू नागरिकांना मिळण्यासाठी ग्रामसेवक व ग्रामसुरक्षा रक्षक यांच्यामार्फत व्यवस्था करण्यात आली आहे. गावात वैद्यकीय पथक तैनात करण्यात येऊन संबंधीतांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या गावात बाहेरील नागरिकांना निर्बंध करण्यात आले असून गावातील नागरिकांना गावाबाहेर जाता येणार नाही यासाठी देवगाव रंगारीचे सहा पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.