औरंगाबाद : गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचे दिसले. मात्र अचानक पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. हर्सूल कारागृहात तब्बल 14 कैदी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कारागृहात चाचणी
25 ते 28 ऑगस्ट दरम्यान हर्सूल कारागृहातील कैद्यांची चाचणी करण्यात आली होती. या चाचणीपूर्वी दोन रुग्ण आढळले त्यानंतर केलेल्या चाचणीनंतर अजून 12 रुग्ण समोर आले. आढळलेल्या बाधितांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. त्यांना तातडीने विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मनपाने केले आहे.
पालिकेचा सतर्कतेचा इशारा
औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने दुसरी लाट पूर्णपणे ओसरली असल्याचे दिसून येत आहेत. मात्र तिसरी लाट येण्याचा धोका असल्याने मनपाच्या पथकांकडून एंट्री पॉईंट, सरकारी कार्यालये, रेल्वे स्टेशन, विमानतळ आदी ठिकाणी दररोज सुमारे अडिच हजार कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. त्यासोबतच सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. डेंग्यू, मलेरिया, चिकन गुनिया यासारख्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून लक्षण आढळल्यास आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन पालिका आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी केले आहे.
हेही वाचा - लसीकरण केंद्रात चोरी, लसीकरणाच्या नोंदीसाठी ठेवलेला संगणक चोरट्यांनी पळवला