औरंगाबाद - शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून पाळलेल्या १३५ गावरान कोंबड्या अज्ञात रोगाने दगावल्याने पैठण परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत संबंधित शेतकरी भाऊसाहेब शिंदे यांनी सांगीतले की, सदृढ वाटणाऱ्या कोंबड्यांच्या डोक्यावरील तुरा एकाएकी काळा पडून क्षणार्धात त्यांचा मृत्यू झाला. मागील तीन दिवसांत पहिल्या दिवशी आठरा, दुसऱ्यां दिवशी १०२, तर तिसऱ्या दिवशी १५ अशा एकूण १३५ कोंबड्यांचा आचानक मृत्यू झाला असून, यामध्ये चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
मृत कोंबड्या तपासणीसाठी पाठवल्या पुण्याच्या प्रयोगशाळेत
अमरापूरवाघूंडी हे गाव जायकवाडी धरणाच्या काठावर असून, देश परदेशातील पक्षी हिवाळ्यात येथे येत असतात. शेतातील खुल्या जागेत फिरणाऱ्या कोंबड्यांचा अचानक मृत्यू होत असल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. पक्षी पालकांकडून बर्ड फ्यूची शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहाणी केली आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून मृत कोंबड्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवल्या आहेत. या कोंबड्यांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला हे अहवाल आल्यावरच स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एक कावळा सापडला मृतावस्थेत
135 कोंबड्या मृतावस्थेत सापडल्या, त्याच बरोबर एक मृत कावळा देखील पथकाला सापडला आहे. अद्याप मृत झालेल्या पक्ष्यांचा कोणताच वैद्यकीय अहवाल आला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे.