औरंगाबाद - शहरात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 40वर पोहोचली असून, 5 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ग्रामीण भाग असलेल्या कसाबखेडात कोरोनाचा रुग्ण सापडल्याने पोलीस अधीक्षकांनी दुसऱ्या वेळेस दिवस शंभर टक्के बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवार सकाळपासून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. कन्नड शहर पोलिसांनी जिल्हा बंदी असल्याने बाहेर गावाहून आलेल्या वाहनांची कडेकोड तपासणी केली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या 40 वर पोहोचली असली, तरी हे सर्व रुग्ण शहरी भागातील आहेत. 1 रुग्ण ग्रामीण भागात आढळल्याने ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये नागरिकांनी गावाची हद्द आधीच बंद केली आहे. कोणालाही गावात येण्याची परवानगी देण्यात आली नसल्याने, कोरोनाचा संसर्ग अद्याप गावापर्यंत पोहोचला नाही. परंतू, कसाबखेडा अशा ग्रामीण भागात हा रुग्ण पोहोचल्याने ग्रामीण भागात सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र, शहरातील अनेक लोक ग्रामीण भागात आपल्या गावी जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे बाहेरून येणारी वर्दळ आणि गावात फिरणाऱ्या लोकांवर आवर घालण्यासाठी दुसऱ्या वेळेस ग्रामणी भाग बंद करण्यात आला आहे.
या बंदला सकाळपासूनच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रुग्णालये आणि औषध दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात खबरदारीचे उपाय केले जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.