औरंगाबाद - लग्नाला अवघा एक महिना राहिला असताना कपडे धूत असलेल्या १८ वर्षीय तरुणीच्या अंगावर विजेची वायर पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शहरातील भावसिंगपुरा भागात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मोनिका सुभाष मिसाळ (वय 18, रा.भावसिंगपुरा, औरंगाबाद) असे मृत्यू पावलेल्या तरुणीचे नाव आहे. एक महिन्यापूर्वीच मोनिकाचा साखरपुडा झाला होता. येत्या 6 एप्रिल रोजी तिचे लग्न होणार होते. त्यामुळे घरचे सर्व सदस्य लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. घरातील लगबग वाढली होती. एक आनंदाचे वातावरण घरात होते. मात्र, भावी वधूच्या मृत्यूने आनंदाचे वातावरण क्षणात दुःखात बदलले.
शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास मोनिका वाड्यात कपडे धूत असताना अचानक वाड्यातील झाडाची फांदी तुटल्याने ती वायरवर पडली व वीज प्रवाह असलेला वायरचा स्पर्श झाल्याने ती जागीच गतप्राण झाली. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक हसीना शेख या करीत आहेत.