अमरावती - बडनेरा येथील भगत चौक परिसरात एका युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. रविवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. संतोष कैथवास असे मृत व्यक्तीचे नाव असून तो गुन्हेगारी पार्श्वभुमीचा असल्याची माहिती मिळत आहे.
रविवारी सायंकाळी भगतसिंग चौकात मयुर कैथवास आणि पालाश कैथवास या दोन युवकांनी संतोषला दगडाने ठेचून मारले. या घटनेमुळे भगतसिंग चौक परिसरात खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळताच बडनेरा पोलीस भगतसिंग चौकात पोहचले. यावेळी जखमी अवस्थेत विव्हळत असणाऱ्या संतोष कैथवास याला पोलिसांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले.
जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत संतोष कैथवास याच्या नातेवाईक आणि मित्रांची गर्दी उसळली होती. पोलिसांनी या प्रकरणात मयूर आणि पालाश कैथवास यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. जुन्या वादातून या दोघांनी संतोष कैथवासवर हल्ला केल्याचे बोलले जात आहे. दोघेही घटनेनंतर पसार झाले आहेत.