अमरावती - दुष्काळात हजारो नागरिकांना पाणी पुरवणारा जलदूत कोरोनाशी लढा देण्यासही सज्ज झाला आहे. संचारबंदीत उपासमार होणाऱ्या गरीबांना ७०० जेवणाचे डबे पोहोचवत आहे. निलेश विश्वकर्मा असे या अन्नदात्याचे नाव आहे.
मागील उन्हाळ्यात प्रचंड पाणीटंचाईचा सामना अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुका करत होता. यावेळी मोफत पाणी पुरवठा करीत जलदूत म्हणून निलेश विश्वकर्मा हे पुढे आले होते. या उन्हाळ्यात कोरोनाचा सामना करताना गोरगरिबांसाठी ते अन्नदाता बनले आहे. संपूर्ण शहरात व जवळच्या गावात दोन्ही वेळचे एकूण 700 जेवणाचे डबे ते पोहोचवीत आहेत. त्यांच्या या डब्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचेही दिसून येत आहे. मागील वर्षी संपूर्ण जिह्याला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. त्यावेळी आपल्या टँकरद्वारे मोफत पाणी वाटप करणारे निलेश विश्वकर्मा यांनी जलदूत म्हणून काम केले.
यावर्षी कोरोनाच्या संकटात शहरातील आपले गोरगरीब बंधू भगिनी उपाशी राहू नये, म्हणून ज्यांचे हातावर पोट आहे, अशा जवळपास एका दिवसात जवळपास ७०० जेवणाचे डबे पोहोचविण्याचे काम जयहिंद क्रीडा मंडळाकडून निलेश विश्वकर्मा यांनी सुरू केले आहे. त्यासाठी त्यांनी आपली स्वतंत्र मेस सुरू केली आहे. त्यात सोशल डिस्टन्सींगचा वापर करत दररोज स्वयंपाक बनवून ते शहरात व आसपासच्या गावात पोहोचविण्याची व्यवस्था मंडळामार्फत करण्यात आली आहे.