अमरावती - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान करणाऱ्या प्रा. अनिलकुमार सौमित्र यांच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन( आयआयएमसी) येथे प्रोफेसर म्हणून झालेल्या नियुक्तीला विरोध करीत मंगळवारी युवकांच्या विविध संघटनांचा मोर्चा आयआयएमसीवर धडकला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात असणाऱ्या या केंद्रावर मोर्चा आल्याने विद्यापीठात खळबळ उडाली.
हे आहे रोषाचे कारण
प्रा. अनिलकुमार सौमित्र यांनी महात्मा गांधी यांचा उल्लेख फादर ऑफ पाकिस्तान असा केला असल्याने त्यांच्याविरोधात देशभर रोष उफाळला आहे. गांधीद्वेष करणारी व्यक्ती पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना काय शिकवतील असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला असून गांधी विरोधी व्यक्ती अमरावतीत पाठविल्याने रोष उफाळून आला आहे.
आंदोलनकर्त्यांचा विभागीय संचालकांच्या दालनात ठिय्या
प्रा. अनिलकुमार सौमित्र यांच्या दालनाबाहेर लागलेली त्यांच्या नावाची पाटी आंदोलकांनी तोडली आणि त्यानंतर विभागीय केंद्र संचालक प्रा. डॉ.विजय सातोकर यांच्या दालनात ठिय्या दिला. प्रा सौमित्र यांची नियुक्ती रद्द करा ही मागणी आंदोलकांनी रेटून धरली. डॉ. सातोकर यांनी विद्यार्थ्यांची मागणी दिल्लीत वरिष्ठांना कळविली. प्रा. सौमित्र यांच्याबाबत काही निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ द्या अशी विनंती आयआयएमसीच्या वरिष्ठांनी केली. प्रा. सौमित्र यांची नियुक्ती रद्द झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असे आंदोलकांनी स्पष्ट केले.
पोलिसही पोचले
या आंदोलनाची माहिती मिळताच फ्रेजारपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांच्या नेतृत्वात पोलिसांचा ताफा विद्यापीठात धडकला. आम्ही शांततेने आंदोलन करत आहोत असे आंदोलकांनी पोलिसांना सांगितले.
प्रा. सौमित्र गो बॅक
आंदोलनकर्त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाच्या प्रवेशद्वारापासून मोर्चा काढला असताना यावेळी 'प्रा. सौमित्र गो बॅक' असा उल्लेख असणारे पत्रकं विद्यापीठ आणि आयआयएमसी केंद्रात फेकली. डॉ. विजय सातोकर यांच्या दलनातही ही पत्रकं भिरकविण्यात आली.
हेही वाचा - सर्वसामान्यापर्यंत लस पोहोचण्यास लागतील किमान सहा महिने'