अमरावती - तिवसा तालुक्यातील सार्शी या गावात राहणाऱ्या आकांक्षा तेलमोरे या तरूणीने आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवले आहे. आकांक्षाचे घराजवळील विवेक वानखडे या तरुणाशी प्रेमसंबंध होते. परंतु, विवेक हा उच्चवर्णीय तर आकांक्षा ही दलित असल्याने मुलाच्या कुटुंबाला हे खटकत होते. प्रेमातून आकांक्षा आपल्याकडे लग्नाची गळ घालेल, म्हणून मुलाच्या कुटुंबाने तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. या धमक्यांमुळेच आकांक्षाने जीव दिला, असा आरोप आकांक्षाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
आकांक्षा तेलमोरे ही १७ वर्षीय तररणी तिवसा शहरात बारावीत शिकत होती. शनिवारी ती शाळेतून घरी आल्यानंतर घरी कुणीच नसल्याचे पाहून तिने बाथरुम मध्ये गळफास घेतला व आपले जीवन संपवले. जातीच्या खोट्या प्रतिष्ठेपोटी आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या या व्यवस्थेनेच तिचा बळी घेतला असल्याचे तिचे कुटुंबीय सांगत आहेत. कुटुंबात आकांक्षा लहान असल्याने सर्वांचीच लाडकी होती. तिच्या जाण्याने तिच्या घरातल्यांना अश्रू अनावर झाले असून आरोपींना अटक करण्याची मागणी ते करत आहे.
या प्रकरणी माहुली पोलिसांनी प्रियकर विवेक नरेंद्र वानखडे, विक्की वानखडे, नरेंद्र वानखडे व दोन महिला असे एकाच कुटुंबातील पाच जणांवर अट्रॉसिटी व इतर गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान या घटनेला आठ दिवस उलटूनसुद्धा शुक्रवारी फक्त प्रियकरालाच अटक करण्यांत आली आहे. उर्वरित चार जणांना अद्यपही अटक केली नसल्याने आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. आरोपीना लवकर अटक करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.