अमरावती - अडीच एकर शेतात ३०० क्विंटल सेंद्रीय हळदीचे उत्पन्न घेतले आहे. अमरावती शहरापासून ३५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तिवसा तालुक्यातील कुऱ्हा येथील युवा शेतकरी सचिन देशमुख यांनी घेतले आहे. यापूर्वी केलेल्या सेंद्रीय डाळिंब आणि संत्री यानंतर आता सेंद्रीय हळदीचा प्रयोग त्यांनी यशस्वी केला आहे.
सचिन देशमुख या युवा शेतकऱयाने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून २५ वर्ष मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी केली. नोकरी करत असताना त्यांचा बराचसा वेळ परदेशवारीत गेला. शेतीची आवड असल्याने त्यांनी नोकरी सोडून कुऱ्हा या मूळ गावी वडिलोपार्जित शेतीत नवे प्रयोग करण्याचे ठरविले. सेंद्रीय डाळिंब आणि संत्री भरगोस उत्पन्न घेतल्यावर जून २०१८ मध्ये त्यांनी अडीच एकारात सेंद्रीय हळद घेण्याचे ठरविले. कुठल्याही प्रकारचे रासानिक खत न वापरता ९ महिन्यानंतर त्यांच्या शेतात जवळपास ३०० क्विंटल हळदीचे उत्पन्न मिळाले आहे. त्यांनी शेतातील हळद पिकाचे डिसेंबर महिन्यात प्रयोग शाळेत संशोधन केले असता ही हळद उच्च दर्जाची असल्याचे प्रमाणित झाले आहे. या हळदीला भारतासह युरोपीय देशात भरपूर मागणी असल्याचे सचिन देशमुख 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.
शेतातील ओली हळद काढण्यात येत असून, ओल्या हळदीला क्विंटलमागे जवळपास २ हजार रुपये भाव आहे. आता ही हळद बोलेंरमध्ये उकळून सुकवली जाणार आहे. ३०० क्विंटल हळद सुकल्यावर ती ७० क्विंटल भरेल. सुकलेल्या हळदीला जवळपास ८ हजार रुपये क्विंटल भाव मिळतो. तर, याची भुकटी केल्यावर एक क्विंटलला १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळतो. या हळदीला देशात तसेच परदेशात विकण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच शेतातून थेट ग्राहकांच्या घरात आमची हळद पोहचावी यासाठी सुध्दा नियोजन केले जात असल्याचे सचिन देशमुख म्हणाले.