अमरावती - राज्यात देहविक्री करण्याऱ्या सुमारे ४० हजार महिलांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कोरोनामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत दरमहा प्रत्येकी पाच हजार रुपये मदत देण्यार असल्याची घोषणा राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. तसेच या महिलांची मुले शाळेत जात असतील तर, अशा महिलांना अतिरिक्त अडीच हजार रुपये मदत सुद्धा देण्याचा शासन निर्णय झाला आहे. त्या अंतर्गत ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी तब्बल ५१ कोटी १८ लाख ९७ हजार पाचशे रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीतून उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे या महिलांना दिलासा मिळाला आहे.
देहविक्री करणाऱ्या महिला व त्यांच्या मुलांना लॉकडाऊन काळात अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने राज्यात तात्काळ कार्यवाही होण्यासाठी यशोमती ठाकूर यांनी यंत्रणेला कार्यवाहीचे निर्देश दिले होते. आता त्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यानुसार वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना याचा लाभ होणार आहे.
शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी अडीच हजार मदत
नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन या संस्थेकडून वेश्याव्यवसायात कार्यरत ओळख निश्चित केलेल्या महिलांना दरमहा पाच हजार रुपये आणि त्या महिलांची मुले शाळेत जात असेल, अशा महिलांना अतिरिक्त २५०० रुपये कोणतेही ओळखपत्र दाखवण्याचा आग्रह न धरता देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
राज्यात देह व्यवसाय करणाऱ्या ३० हजार महिला
राज्यातील एकूण ३२ जिल्ह्यात तब्बल ३०९०१ इतक्या देहव्यवसाय करून पोट भरणाऱ्या महिला आहे. तर ६४५१ हे शिक्षण घेणारी बालके आहे. राज्य सरकार ने घेतलेल्या या निर्णयामुळे या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र हे पहिलेच राज्य
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील देहव्यवसाय करणाऱ्या महिलांना ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान प्रत्येकी पाच हजार रुपये आणि आता त्यांना मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय करण्यात आला आहे. त्यामुळे वेश्या व्यवसाय करणाऱ्यांना या महिलांना लाभ देणारे हे देशातील पहिलेच राज्य असल्याचेही महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.
हेही वाचा - महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती, सरकारने वर्षभरात घेतले 'हे' महत्वाचे निर्णय