कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याच जिल्ह्यात हजारो कामगारांच्या पगारीवर कुऱ्हाड - कामगारांची पगार कपात
राज्याचे कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या जिल्ह्यातच कामगारांवर पगार कपातीची कुऱ्हाड कोसळली आहे. लॉकडाऊनच्या काळात अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसीमधील रतन इंडिया या वीज निर्मिती प्रकल्पा अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटदार कंपन्यांनी हजारो कामगारांची मोठी वेतन कपात केल्याचे समोर आले आहे.
अमरावती - राज्याचे कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या जिल्ह्यातच कामगारांवर पगार कपातीची कुऱ्हाड कोसळली आहे. लॉकडाऊनच्या काळात अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसीमधील रतन इंडिया या वीज निर्मिती प्रकल्पा अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटदार कंपन्यांनी हजारो कामगारांची मोठी वेतन कपात केल्याचे समोर आले आहे. महत्वाची बाब म्हणजे, राज्याचे कामगार राज्यमंत्र्यांनाच कंपन्या राज्यमंत्र्यानाच जुमानत नसल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणी कामगारांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री बच्चू कडू व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सुद्धा काहीच तोडगा निघाला नसल्याच कामगारांच म्हणणं आहे.
या कंपनीमध्ये काम करणारे सर्व कामगार हे ग्रामीण भागातील आहेत. कोरोनाच्या कठीण काळातही त्यांनी कंपनीच्या आदेशाचे पालन करत जीवाची परवा न करता आपले काम केले. यानंतरही या कामगारांच्या वेतनात कंपन्यानी मोठी कपात केली. कामगारांना सद्य घडीला केवळ दोन ते पाच हजारांपर्यंत पगार दिला जात आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबीयावर आर्थिक संकट कोसळले आहे. एकीकडे सरकार पगार कपात करू नका असे आवाहन करत आहे. तर दुसरीकडे कंपन्यानी आपली मनमानी सुरू केली आहे.
दरम्यान, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू हे सातत्याने कामगारांच्या पाठीशी राहत असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले. पण आता त्याच्याच जिल्ह्यातील कंपन्या बच्चू कडू यांना जुमानत नसल्याचे समोर आले. कामगारांची झालेली वेतन कपात यावर बच्चू कडू कंपन्यावर काय कारवाई करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा - कोरोनाला रोखण्यासाठी कायदा, सुव्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी करा, पालकमंत्र्यांचे निर्देश
हेही वाचा - कापसाच्या रेच्यांसह प्लास्टिक गोदामाला भीषण आग, अमरावतीच्या ट्रान्सपोर्ट नगर परिसरातील घटना