अमरावती - महिलांच्या सक्षमीकरणामध्ये महत्वाचा वाटा असलेला उमेद प्रकल्प बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उमेद बंद होणार असल्यानं हजारो महिला कर्मचाऱ्यांचे रोजगार जाणार आहेत. त्यामुळे हा प्रकल्प बंद करण्यात येऊ नये यासाठी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
राज्यात राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उमेद प्रकल्प सुरू आहे. उमेदमध्ये महिलांना रोजगार दिला जातो. मात्र आता हा प्रकल्प सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतल्याने हजारो महिलांचे रोजगार जाणार आहेत. त्यामुळे संतप्त महिलांकडून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. उमेदमधील कंत्राटी कामगार प्रकल्प बंद पडू नये यासाठी आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे कंत्राटी पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांना पुन्हा नियुक्ती देऊ नये असा आदेश शासनाने काढला आहे. हा आदेश मागे घेण्याची मागणी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आलीये.