अमरावती - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १ मेपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे सकाळी ११ वाजेपर्यंतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. शासकीय स्वस्त धान्य दुकानेदेखील फक्त अकरा वाजेपर्यंत सुरू राहतात. त्यामुळे अमरावती शहरातील वडाळी परिसरात असलेल्या सरकारी स्वस्त धान्य दुकानासमोर पहाटे चार वाजल्यापासूनच शेकडो गोर-गरीब नागरिक लांबचलांब रांगा धरून बसत आहेत. त्यामुळे 'मजुरी करायला जावं की, धान्य घेण्यासाठी रात्रभर जागावं?' असा संतप्त सवाल वडाळी येथील महिलांनी केला आहे.
कोरोनामुळे दुकानाच्या वेळेवर निर्बंध -
अमरावतीच्या वडाळी परिसरात सरकारी स्वस्त धान्याचे दुकान आहे. या दुकानात दोन हजार ग्राहकांच्या शिधापत्रिका आहे. त्यामुळे या दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पूर्वी दुकान सुरू ठेवण्यासाठी वेळेचे कुठलेच बंधन नव्हते. त्यामुळे लोकांना रांगेत उभे राहावे लागत नव्हते. परंतु आता कोरोनामुळे अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे दुकानाची वेळ ही मर्यादित केली आहे. सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवावे लागत असल्याने लोकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे भल्या पहाटे चार वाजतापासून महिला व नागरिक धान्य खरेदीसाठी रांगा लावतात.
भल्या पहाटे येऊनही अनेकांना जावे लागते परत -
रेशन घेण्यासाठी दरोरोज सकाळी शंभर ते दिडशे ग्राहक दुकानावर येतात. मात्र, ११ वाजेपर्यंत सर्व लोकांना धान्य मिळत नाही. त्यामुळे उर्वरित नागरिकांना धान्य न घेताच परत जावे लागते. अनेकजण आपली कामे सोडून धान्य घेण्यासाठी येतात.
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा -
धान्य खरेदी करण्यासाठी वडाळी परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक सकाळी चार वाजतापासून रांगा लावतात. यातील अनेक लोक पिशव्या रांगेत ठेवून एका ठिकाणी समूहाने बसत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येथे सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडाला आहे. त्यामुळे कोरोना वाढण्याची भीतीही वर्तवण्यात आली आहे.
दुकानासाठी वेळ वाढवून द्यावी -
कोरोनामुळे दुकान उघडण्याच्या वेळेवर मर्यादा आली आहे. त्यामुळे लोकांना अकरा वाजेपर्यंत मोजक्याच लोकांना धान्य मिळते. त्यामुळे दुकानाच्या वेळेत वाढ करून द्यावी, अशी मागणी दुकानदारांनी केली आहे.