अमरावती - मागील दीड महिन्यांपासून संपूर्ण विदर्भात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे यंदाही शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले खरीप हंगामातील पिकं हातातून निघून गेल्याने शेतकऱ्यांची दिवाळी यंदाही अंधारात जाणार आहे. विदर्भातील शेतकरी सर्वाधिक सोयाबीन आणि कापूस उत्पादन घेत असतात. त्यातच पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यातही दरवर्षी कापसाचा पेरा होतो. मागील वर्षी बोंडअळीने कापसाचे प्रचंड नुकसान झालं होते. तर यंदा संततधार पावसाने कापसाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पांढरं सोनं मिरवणारा कापूस आता मात्र काळा पडल्याने शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले आहे.
या पावसात वाहून गेले आहे.
संततधार सुरू असलेल्या पावसामुळे शेतजमीनीत पाणी साचले आहे. परिणामी कपाशील क्षमतेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने कपाशी सडायला लागली असून, प्रत्येक कपाशीचे दहा ते पंधरा बोंडं खराब होऊन काळवंडले आहेत. त्यामुळे सोयाबीन पाठोपाठ आता कपाशीही शेतकऱ्यांच्या हातातून जाते की काय अशी भीती शेतकऱ्यांना पडली आहे.
जवळपास एक लाख हेक्टरवर नुकसान
मागील वर्षी कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणावर बोंड अळीचा प्रादुर्भाव होता. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन 50 टक्क्यांपेक्षा ही खाली आली होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या वर्षी सोयाबीनला प्राधान्य दिले. परंतु, सतत सुरू असलेल्या पावसामुळे पश्चिम विदर्भातील 2 लाख 38 हजार हेक्टरवरील सोयाबीन हे पावसामुळे खराब झाले आहे. तर ज्या शेतकऱ्यांची कपाशी पिकावर भिस्त होती. त्या कपाशीचेही नुकसान जवळपास एक लाख हेक्टरवर झाले आहे. त्यामुळे कपाशीला लावलेला खर्चही निघणार नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.
सरकार केव्हा मदत करणार
अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील मोझरी येथील युवा शेतकरी महेश दहीकर यांनी यावर्षी आपल्या दोन एकरवरील शेतात कपाशीची लागवड केली होती. नोकरी लागत नाही म्हणून महेश शेतीकडे वळला. परंतु, शेतीतही आता राम उरला नसल्याचे महेशनी सांगितले. यावर्षी सुरूवातीला कपाशी चांगली असल्याने महागड्या फवारणी केल्या. चांगले उत्पन्न होईल ही आशा होती. परंतु, सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे शेतात पाण्याचे डबके साचले आणि त्यामुळे कपाशी पार सडून गेली आहे. त्यामुळे लावलेला खर्च निघेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना बळीराजा म्हणून ओळखलं जात. परंतु, यामध्ये शेतकऱ्यांचा बळी गेला आणि त्यातला राजाही गेला अशी प्रतिक्रियाही महेश यांनी दिली आहे.
पश्चिम विदर्भात असे झाले कपाशीचे नुकसान?
यावर्षी पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात 10 लाख 16 हजार 431 हेक्टर वर कपाशीची लागवड झाली होती. त्यापैकी या पावसामुळे 1 लाख 1 हजार 554 हेक्टर वर कापसाचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे. या मध्ये सर्वाधिक नुकसान 66 हजार 952 हेक्टरवर अमरावती जिल्हात झाले आहे.
कोणत्या जिल्ह्यात कापसाचे किती नुकसान
- -बुलढाणा-19 हजार 926 हेक्टर.
- -अकोला -7 हजार 734 हेक्टर.
- -वाशीम -481 हेक्टर.
- -अमरावती-66 हजार 952 हेक्टर.
- -यवतमाळ-6461 हेक्टर.
हही वाचा - खरीप पिकासह बागायती पिकांनाही नुकसान भरपाई मिळावी -देवेंद्र फडणवीस