अमरावती - कोरोनामुळे राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. इतर पिकांबरोबरच आता टरबूज उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कारण ८-१० रूपयापर्यंत विकले जाणारे टरबूज यंदा लॉकडाऊनमुळे मात्र शेतकऱ्यांना अमरावती बाजार समितीत दोन रुपये किलोने विकण्याची वेळ आली आहे. विषेश म्हणजे दोन रूपये किलो दराने सुद्धा किरकोळ व्यापारी खरेदी करत नसल्याने टरबूज बाजारातच फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. लाखो रुपये खर्च करून पिकविलेल्या टरबुजाला कवडीमोल भाव मिळत असल्याने लागवडीचा खर्च सुद्धा निघणार नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
लॉकडाऊनचा विक्रीला फटका
मागील वर्षी उन्हाळ्यात कोरोनामुळे कडक लॉकडाऊन होते. तेव्हाही टरबूज फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. त्यातून सावरत यंदा तरी दोन पैसे मिळेल या आशेने जिल्ह्यातील शेकडो शेतकरी व काही तरूण शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेकडो हेक्टर परिसरात टरबूज लागवड केली पण एप्रिल महिन्यात जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढल्याने लॉकडाऊन लावण्यात आला. वेळेचे निर्बंध असल्याने व मोठ्या बाजारपेठाच बंद असल्याने टरबूज उत्पादकाना मोठा फटका हा बसला आहे.
मोजक्याच गाड्यातील टरबूजची होते विक्री
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ बाजारपेठेत दरोरोज १५ ते २० गाड्या टरबुजाची आवक असते परंतु लॉकडाऊनमुळे चिल्लर विक्री करणाऱ्या ग्राहकांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे मोजक्याच गाड्यातील टरबुजाची विक्री होत असून उर्वरित गाड्या विनाविक्री बाजारपेठमध्ये तशाच पडून राहत आहेत.
मध्यरात्री तीन वाजल्यापासून शेतकरी होतात दाखल
सकाळी टरबूज लवकर विक्री व्हावी जेणेकरून दोन पैसे जास्त मिळतील या आशेवर शेतकरी मध्यरात्री तिनच्या सुमारासच बाजारपेठेत दाखल होतात. मात्र तिथे त्यांना टरबूज २ रुपये किलो विकावे लागतात.
लागवडीचा खर्चही निघेना
एक एकर टरबूज पिकाच्या लागवडीचा खर्च हा जवळपास 70 ते 80 हजारांपर्यंत येथे येत असल्याचे टरबूज उत्पादक शेतकरी सांगतात. परंतु यावर्षी टरबुजाच्या किंमतीमध्ये घट झाल्यामुळे मात्र यावर्षी लागवडीचा खर्च निघणार नसल्याचे टरबूज उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.
खरीप हंगाम कसा करायचा?
यावर्षी उन्हाळ्यातील टरबूज पिकाला लॉकडॉऊनमुळे फटका बसला आहे. टरबुजामधून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या माध्यमातून आम्ही खरीप हंगामात पेरणी करत असतो. परंतु आता नुकसान झाल्याने खरीप हंगामात बी बियाणे आणून पेरणी कशी करावी? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.