अमरावती- राज्यातील काही भागात सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांना दूरदूरपर्यंत भटकंती करावी लागत आहे. असे असतानाही अमरावती शहरात मात्र पाण्याची नासाडी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील श्री शिवाजी वाणिज्य व कला महाविद्यालया जवळ महाराष्ट्र जल प्राधिकरण विभागाची पाईप-लाईन फुटली असून यातून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
पाणी टंचाईमुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी रान उठवले आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून शिवाजी महाविद्यालय परिसरात महाराष्ट्र जल प्राधिकरण विभागाच्या फुटलेल्या पाईप लाईनमधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. तरीही प्रशासनाकडून मात्र या गळतीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
शहरात एकीकडे पाणी टंचाई आणि दुसरीकडे अशा प्रकारची नासाडी होत आहे. त्यामुळे नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.