अमरावती - गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यातून वाहणारे पाणी थेट परिसरातील दुकानांमध्ये शिरल्याने शेगाव नाका परिसरातील आशियाड कॉलनी चौकात खळबळ उडाली. नाल्याच्या काठावर मोठ्या इमारती बांधून अतिक्रमण करण्यात आल्याने नाल्याचे पाणी रस्त्यावर येत होते. गुरुवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत अमरावती शहरात मुसळधार पाऊस कोसळला.
दरम्यान, शेगाव नाका परिसरातील आशियाड कॉलनी भागात सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाली बांधकाम सुरू आहे. नाल्याच्या काठालागत असणाऱ्या एका सदनिकेच्या तळमजल्यावर मार्केटमध्ये दहा दुकाने आहेत. या दुकानदारांनी रस्त्याची उंची वाढल्यामुळे रस्त्याचे पाणी दुकानात शिरते म्हणून रस्त्याच्या लागत मार्केटच्या हद्दीत भिंत उभारली होती. असे असताना नाली बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ही भिंत तोडली. मात्र, कामाचा 20 दिवसांपासून पत्ता नव्हता. गुरुवारी मुसळधार पाऊस कोसळताच रस्त्यावरच्या पाण्यासह लगतच्या नाल्यातून वाहणारे पाणी या इमारतीच्या मार्केटसह पलीकडील आणखी तीन इमारतींच्या तळ मजल्यावर असणाऱ्या सर्व दुकानात शिरले. या प्रकारामुळे सर्व दुकानदारांची रात्रभर तारांबळ उडाली. सर्वच दुकानात कमरेपर्यंत पाणी साचल्याने दुकानातील लाखो रुपयांचा माल भिजून गेला.
या भागातील नागरिकांनी हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर व्हायरल केल्याने शुक्रवारी सकाळी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार आशियाड कॉलनी परिसरात धावून आले. परिसरातून वाहणाऱ्या नाल्यावर काही इमारतींनी अतिक्रमण केले. त्यामुळे नाल्याच्या पाण्याला वाहून जाण्यासाठी जागा अपुरी पडते. त्यामुळे हे घाण पाणी रस्त्यावर येत असल्याच्या तक्रारी येथील राहिवाश्यांनी प्रभागाचे नगरसेवक विजय वानखडे यांच्याकडे केल्या. नाल्याला येणाऱ्या पुराचे व्यवस्थापन करण्यास मी महापालिकेला सांगितले असून, ही अडचण त्वरित सुटेल असे नगरसेवक विजय वानखडे 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले.
या भागातील रहिवासी असणारे प्रहार संघटनेचे पदाधिकारी चंद्रकांत खेडकर यांनी नाल्यावरील अतिक्रमण या सर्व प्रकारास कारणीभूत असल्याचे सांगितले. येथील दुकानदारांनी आमच्या दुकानासमोरची संरक्षण भिंत विनाकारण पाडून 20 दिवस काम बंद ठेवले. यामुळे आज आमच्या दुकानात पाणी शिरले, असा आरोप केला. या भागात नाल्याला येणाऱ्या पुरासाठी जबाबदार असणाऱ्या नाल्यातील अनधिकृत बांधकामामाबत प्रभागातील नगरसेवकांनी बोलणे टाळले असले तरी महापालिका प्रशासन या गंभीर समस्यायची दाखल घेणार का? असा सवाल परिसरातील नागरिकांनी केला.