अमरावती - अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली. विलासनगर येथील शासकीय गोदामात मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे. सकाळी 6 वाजता सर्व अधिकारी आणि कर्मचारी केंद्रांवर दाखल झाले आहेत. सुरुवातीला मतपत्रिकांचे गठ्ठे एकत्रित केले जात असून प्रत्यक्ष मतमोजणीला दुपारी 2 नंतर सुरुवात होणार आहे.
दोन कक्षातील 14 टेबलवर मतमोजणी -
दोन कक्षात 14 टेबलवर मतमोजणी होत आहे. 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे सर्व मतपत्रिका एकत्र करण्यात येत आहेत. त्यातून 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे 40 गठ्ठे, अशी एक हजार मते प्रत्येक टेबलवर आहेत. या टेबलवर प्रथम क्रमांकाच्या पसंतीनुसार मतपत्रिकामचे वर्गीकरण केले जात आहे. एकूण वैध मतांप्रमाणे ठरवण्यात आलेला मतांचा कोटा पूर्ण झाला नसल्यास आवश्यकतेनुसार दुसऱ्या व तिसऱ्या पसंतीची मते मोजण्यात येतील.
रात्री 12 नंतर निकाल -
एकूण 27 उमेदवारांपैकी पहिल्या पसंतीची मते कोणाला मिळतात. मतांचा कोटा कोणता उमेदवार पूर्ण करेल ही संपूर्ण प्रक्रिया किचकट आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकाल रात्री 12 नंतरच येण्याची शक्यता आहे.
मतमोजणी केंद्रावर आरोग्य तपासणी -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्रावर आरोग्य तपासणी केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रावर येणाऱ्या प्रत्येकाची आरोग्य तपासणी केली जात आहे. याठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही आहे. निवडणूक आयोगाने ज्यांना पास दिले आहेत केवळ त्याच व्यक्तीला मतमोजणी केंद्रात सोडण्यात येत आहे.