अमरावती : गेल्या काही काळापासून ते कॅन्सर या आजाराने ग्रस्त होते. मध्यंतरी त्यांची प्रकृती स्थिरावली होती, पण अचानकपणे काल त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. रविवार दि. 29 रोजी अंत्यविधी होणार आहे. स्व. डॉ. दिलीप मालखेडे यांचे पार्थिव पुणे येथून अमरावतीला आणण्यात येत आहे. त्यांच्या पार्थिवावर सकाळी 10.00 वाजता हिंदू स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
8 वे कुलगुरू म्हणून पदभार : 16 सप्टेंबर 2021 रोजी त्यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे 8 वे कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यापूर्वी ते अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद येथे वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत होते. पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे ते विभागप्रमुख होते. 27 ऑगस्ट, 1966 रोजी डॉ. दिलीप नामदेवराव मालखेडे यांचा जन्म झाला. अमरावती जिल्ह्रातील बहिरम करजगांव हे त्यांचे मूळ गाव. डॉ. दिलीप मालखेडे यांचे शालेय शिक्षण अमरावती जिल्ह्यातच पूर्ण झाले होते. मुंबईच्या आयआयटीमधून पदवी ते डॉक्टरेटपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अशा वेळी बऱ्याच जणांना परदेशातील संधी खुणावतात होती मात्र अमरावती येथील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये काही काळ काम केल्यानंतर, डॉ. मालखेडे पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कार्यरत झाले. अध्यापनाबरोबरच संशोधन आणि प्रशासन या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांडून शोक : कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या दु:खद निधनाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच अनेकांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या दु:खद निधनाप्रसंगी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, सर्व संवैधानिक अधिकारी, शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयांमधील प्राचार्य, विद्यार्थी तसेच सर्व नागरिकांनी शोक व्यक्त केल्या आहेत.
सल्लागारपदी दोन वेळा नियुक्ती : या तिन्ही क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळेच, त्यांची अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या सल्लागारपदी दोन वेळा नियुक्ती करण्यात आली. देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. विद्यार्थ्यांच्या अडचणींची नेमकी माहिती असल्याने, त्याला अनुकूल धोरणे तयार करण्यामध्येही त्यांनी पुढाकार घेतला. अमरावती तसेच विदर्भातील अनेक तंत्रशिक्षण व अभियांत्रिकी महाविद्यालांना अर्थसाहाय्य मिळवून देण्यातही त्यांनी मोठी कामगिरी बजावली.
शिष्यवृत्तीची ऑनलाइन पद्धत : अमरावती विद्यापीठातील वसतिगृहाच्या उभारणीसाठी त्यांनी केलेले साहाय्य अमरावतीकर कधीच विसरू शकणार नाहीत. मागासवर्गीय तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची ऑनलाइन पद्धत लागू केली. त्याचा लाभ दरवर्षी हजारो विद्यार्थी घेत आहेत. विविध आंतराराष्ट्रीय अभियांत्रिकी स्पर्धांमध्ये भारतीय संघ पाठिण्याबाबत डॉ. मालखेडे यांनी सातत्याने आग्रही भूमिका घेतली होती. देशपातळीवर विद्यार्थ्यांसाठी हँकेथॉनसारख्या स्पर्धांचे आयोजनही केले होते. आता विद्यापीठातही ते विद्यार्थीकेंद्री उपक्रम राबवत होते.