अमरावती - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्याने काम बंद झाले आहे. त्यामुळे पुणे येथून उत्तर प्रदेश येथे आपल्या गावाकडे एका बोलेरो पीक वाहनाने परत जाणाऱ्या १८ मजुरांच्या वाहनाला अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिवणगाव जवळ महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून १८ लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश येथील 13 मजूर पुणे येथून आपल्या 5 महिला व 6 मुलांना घेऊन शुक्रवारी रात्रीच्या अंधारात गावी जाण्यास (एमएच 12, क्यूजी-9857) या बोलेरो पीक अप वाहनाने निघाले होते. त्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत 600 किमी अंतर चुकवून शनिवारी दुपारी अमरावती जिल्ह्यात प्रस्थान केले असताना अचानक तिवसा येथील उपविभागीय महसूल अधिकारी नरेंद्र फुलझेले यांना हे वाहन शिवणगाव नजीक संशयास्पद स्थितीत आढळले, तेव्हा त्यांनी विचारपूस केली असता संशय बळावताच सदर वाहन तिवसा येथील ग्रामीण रुग्णालयात आणून सर्व जणांची वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन मालूसरे यांनी तपासणी केली.
तिवसा पोलिसांनाही याबाबत माहिती देऊन पाचारण केले होते. तपासणीनंतर त्यांना होम क्वारंटाईन केले असून या सर्वांना सध्या समाजकल्याण वसतिगृहात 14 दिवसांसाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. मात्र, पुणे येथून एवढे मोठे अंतर चुकवून अमरावतीपर्यंत आले कसे? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला असून वाहन तिवसा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यावेळी तिवसा तहसीलदार वैभव फरतारे, न.पं मुख्याधिकारी पल्लवी सोटे, नायब तहसीलदार दत्तात्रय पंधरे उपस्थित होते.