अमरावती - राज्यातील सर्व मंदिर उघडण्यात आल्याने कौंडण्यापूर येथील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचे स्वागत केले. मंदिर उघडण्यासाठी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलन केले होते. त्याची सरकारने दखल घेतली, असेही वंचितच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी कौंडण्यापूरच्या मंदिरात विठ्ठल रुक्मिणीची त्यांनी विधीवत पूजा केली.
विदर्भाची पंढरी म्हणून ओळख
माता रुक्मिणीचे माहेरघर असलेल्या कौंडण्यपूरची विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळख आहे. जे भाविक पंढरपूरला दर्शन घ्यायला जाऊ शकत नाहीत. ते कौंडण्यपूरला येऊन माता रुक्मिणीचे दर्शन घेतात. याच ठिकाणी श्रीकृष्णाने माता रुक्मिणीचे हरण केल्याची आख्यायिका आहे. दिवाळीनंतर कार्तिक महिन्यात कौंडण्यपुरात मोठा सोहळा भरतो. या सोहळ्या दरम्यान तब्बल आठ दिवस येथे मोठी जत्रा भरते.