अमरावती - देशद्रोहाचा आरोप असलेल्या जेएनयू विद्यापीठाचा विद्यार्थी नेता उमर खालिद याची १७ फेब्रुवारीला शहरात जाहीर सभा झाली होती. या सभेला शहर पोलिसांनी फक्त स्थानिक नागरिकांनाच बोलण्याची परवानगी दिली होती. मात्र, सभेत जिल्ह्या बाहेरून आलेल्या उमर खालिदने उपस्थिती दर्शवून नागरिकांना संबोधित केले. त्यामुळे, शहर पोलिसांनी सभेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी दिली.
१७ फेब्रुवारीला शहरामधील चांदणी चौकात सुधारित नागरिकत्व कायद्या विरोधात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला उमर खालिद उपस्थित होता. सभेला संबोधित करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जेव्हा भारतात येतील त्या दिवशी आम्ही रस्त्यावर उतरू. केंद्र सरकार ही महात्मा गांधींच्या शिकवणीला पायदळी तुडवत आहे आणि देशाला विभाजित करण्याचा प्रयत्न करीत आहे हे जगाला दाखवून देऊ, असा इशारा नेता उमर खालिद याने दिला होता. उमर खालिदने केलेले हे वक्तव्य दिल्ली हिंसाचारसाठी चिथावणी खोर असल्याचा आरोप भाजपकडून होत आहे. सभेत बोलण्यासाठी फक्त स्थानिक लोकांनाच परवानगी असताना उमर खालिदने सभेला संबोधले. त्यामुळे, शहर पोलिसांनी या सभेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, उमर खालिदने सभेत केलेल्या एका वक्तव्याचा दिल्ली हिंसाचाराशी संबंध जोडला जात आहे.
हेही वाचा- थ्रेशर मशीनमध्ये अडकून मजुराचा मृत्यू