अमरावती - जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला (विश्वेश्वर) ते पाथरगाव रोडवर असणाऱ्या एका शेतात विहिरीच्या खोलीकरणाचे काम सुरू होते. या विहिरीचे काम सुरू असताना क्रेनचा रॉड तुटल्याने एका मजुराचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेत एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज रविवारी (२६ मे) सकाळी साडे अकराच्या समारास घडली.
उमेश नारायन काळे व विनोद सिताराम राठोड दोघेही (रा. साखरा ता. दिग्रस जि. यवतमाळ) असे मृत मजुरांचे नाव आहे. संतोष चव्हाण असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या जखमीवर अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजेंद्र मारोतराव डंबारे (रा. आमला विश्वेश्वर) यांच्या शेतातील विहीरीच्या खोलीकरणाचे काम मजुरांच्या सहाय्याने सुरू होते. विहिरीतून निघालेला मलबा डिसेल क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात येत होता. यात रविवारी सकाळी काही मजूर विहीरीत आधीच उतरले होते. तर क्रेनच्या सहाय्याने तीन जण विहिरीत उतरत असताना अचानकपणे क्रेनचा रॉड तुटला, यात क्रेनमधून उमेश काळे हा थेट विहिरीत पडला त्याला जबर मार लागल्याने त्याचा घटनास्थळी विहिरीत पडून मृत्यू झाला तर यात इतर दोन मजुरांनी रॉड तुटल्याबरोबर उड्या मारल्याने ते गंभीर जखमी झाले होते. दोघांनाही अमरावती येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले होते.
उपचारादरम्याम विनोद राठोड याचा मृत्यु झाला आहे. संतोष चव्हाणवर उपचार सुरू आहेत. उमेश काळे यांचे चांदूर रेल्वे ग्रामीण रूग्णालयात तर विनोद राठोडवर अमरावती येथे शवविच्छेदन करण्यात आले. ही विहीर ११० फूट खोल होती. कुऱ्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.