अमरावती - चारचाकी वाहनांच्या गॅरेजवर आपल्याला नेहमीच पुरुष काम करताना दिसतात. मग गाडी दुरुस्त करण्यापासून ते गाडी धुण्यापर्यंत या कामात आपल्याला पुरुषांचीच मक्तेदारी दिसते. परंतु, या मक्तेदारीला मोडत अमरावतीमधील दोन महिलांनी मात्र एका मोटर गॅरेजवर काम करण्यासाठी पदर खोचला आहे. कोण आहे त्या अमरावतीमधील नवदुर्गा पाहुया या रिपोर्टच्या माध्यमातून..
अमरावती जिल्हा हा ताईंचा जिल्हा म्हणून ओळखला जात आहे. अगदी देशाची पहिली राष्ट्रपती महिला प्रतिभाताई पाटील यांच्या नावाने लाभली, त्यानंतर अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आहेत. खासदार नवणीत राणा. अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके आहेत. एवढेच नाही तर अमरावती शहराच्या सुरक्षिततेची जबाबदारी खांद्यावर आहेत, त्या आरती सिंग या महिला आहेत. असे असतानाच आता अमरावती शहरातील वर्षा बगडे आणि दुर्गा यादव या सर्वसामान्य महिलांनी आता गॅरेजवरील कामात खंबीरपणे पाय रोवला आहे. मागील अनेक महिन्यांपासून त्या अमरावती शहरातील बडनेरा रस्त्यावरील एका वर्कशॉपवर कामगार म्हणून काम पाहतात.
स्वयंपाक घरातील कामातून गॅरेजमध्ये
यातील वर्षा बगडे यांचे पती गवंडी काम करतात. पण त्यांच्या घर कमाईत घर खर्च भागत नसल्याने वर्षा बगडे या अमरावती मधील समाजकल्याण कार्यालयात स्वयंपाक घरात काम करत होत्या. परंतु, तेथील काम सुटल्याने कुटुंबाचा गाडा हाकावा कसा? अशी चिंता होती. दरम्यान, बडनेरा रस्त्यावरील गॅरेजबद्दल त्यांना माहिती भेटली आणि त्यानंतर त्या गॅरेजमध्ये काम करू लागल्या.
हेही वाचा - ..त्याऐवजी पंकजा यांनी ऊसतोडणी कामगारांची भाषा बोलावी- प्रकाश आंबेडकर
अशीच कहाणी आहे दुर्गा यादव या कारागीर महिलेची दुर्गा यादव यांचे पती किराणा दुकानात काम करतात. परंतु, अल्पशा पगारामध्ये घर खर्च भागत नाही, त्यात उराशी असलेल्या तीन मुलींच्या शिक्षणाचा खर्च, अशा परिस्थितीत काय करावे म्हणून त्यांनी पुरुष मक्तेदारी असलेल्या या व्यवसायात पाय रोवण्याचे काम केले. आज या दोन्ही महिला सक्षमपणे या मोटार गॅरेजवर काम करतात.
कुठलेही काम कठीण नसते
कारचे कलरिंग, वॉशिंग, सर्व्हिसिंग आधी कामे या महिला खंबीरपणे करत आहेत. त्यांच्या या कामगिरीने जिल्ह्यातील महिलांना एक आदर्श घालून दिला आहे. व्यक्तीसाठी कुठलेही काम कठीण नसते फक्त ते काम करण्याची आपली तयारी असली पाहिजे असे दोघीही सांगतात. दरम्यान, या वर्कशॉपचे मालक मनोज मोने सांगतात की, अमरावती हा ताईंचा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील महिलांनी तरी आता मागे राहायला नाही पाहिजे. याआधीही माझ्याकडे चार महिला कामाला होत्या. दरम्यान, अशा पद्धतीने कुठल्या महिला काम करायला तयार असतील तर मी त्यांना रोजगार देतो.