अमरावती - दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील वडनेर गंगाई आणि राजखेड येथील पुरुषांनी आत्महत्या केल्या आहेत.
पहिल्या घटनेत वडनेर गंगाई येथील शेतकरी अमोल रामराव माहोरे (वय 35) यांनी सोमवारी मध्यरात्री राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मरणाआधी त्यांनी त्यांच्याकडे कर्ज असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यांच्यामागे आई, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.
दुसऱ्या घटनेत दर्यापूर तालुक्यातीलच राजखेड येथील प्रशांत रंगराव दळवी (वय 27) यांनी आपल्या राहत्या घरात नैराश्यातून आत्महत्या केली. त्यांच्यामागे आई व भाऊ असा परिवार आहे. येवदा पोलीस या घटनांचा अधिक तपास करीत आहेत.