अमरावती : नाट्यकलावंत, साहित्यिक अशी ओळख निर्माण केल्यानंतर डेंटिस्ट म्हणून मुंबईच्या अंधेरी पूर्व येथे डॉ. राजू तुरकाने यांनी सायकलपटू म्हणून आपली आणखी एक वेगळाी ओळख निर्माण केली आहे. आपले क्लिनिक चालविणारे अमरावती जिल्ह्यातील युवक सिनेसृष्टीत जाण्याचे स्वप्न ( Dream of becoming Actor ) पहात एफटीआयमधून पदवी घेऊन सिनेसृष्टीत संधी मिळेल म्हणून धडपड करीत असताना लहानपणी जडलेला दुर्धर आजाराने पुन्हा एकदा त्याच्यावर आघात ( Lost One Leg In Childhood ) केला. अशा परिस्थितीत निराश न होता जगाला आपण काहीतरी करून दाखविण्याची जिद्द बाळगत त्या युवकांनी चक्क एका पायावर सायकल चालवणे हीच साधना मानली. चक्क दिल्ली ते मुंबई, मुंबई ते पुणे, मुंबई ते नागपूर असा सायकली द्वारे थेट दोन लाख किलोमीटरचा प्रवास आजवर केला. डॉ. राजू तुरकाने आपल्याला जडलेल्या दुर्धर आजारावर मात करून पुन्हा एकदा सायकलवर स्वार होऊन जगण्याचे स्वप्न पाहतो आहे.
शिक्षणाची होती प्रचंड आवड : नाटक लिहिणे, नाटक करणे हेच आपले ध्येय असल्याचा निश्चय करून मुंबईच्या सिने सृष्टीच्या दिशेने वाटचाल करणारे डॉ. राजू तुरकाने यांना शिक्षणाची देखील प्रचंड आवड होती. 2002 मध्ये अमरावतीच्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळी इथून शिक्षण अभ्यासक्रमाची पदविका घेतल्यावर त्यांनी 2007 मध्ये त्यांनी दंत चिकित्सेची पदवी प्राप्त केली. पुण्याला एफटीआयमधून त्यांनी सिनेमा तंत्रज्ञानासंदर्भात अभ्यासक्रम पूर्ण केला. यासोबतच इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवीदेखील मिळवली. वाचनाची आणि साहित्याची आवड असल्याने डॉक्टर राजू तुरकाने यांनी 'फेलीव्हर लव स्टोरी ', 'सायकलिंग किडा ', ही पुस्तकं लिहून प्रकाशित करून घेतली.
सायकल चालवणे हीच साधना : लहानपणी एक पाय गमवावा लागला असला तरी जिद्दीने एकाच पायावर सायकल चालविण्याचा छंद लहानपणापासूनच ( Cycling Hobby ) जोपासला. आपण काहीतरी चांगलं करावं यासाठी माझी धडपड होती मात्र 2016 मध्ये पुन्हा एकदा दुर्धर आजाराने घात केला. हा आजार जडल्याने निराशेत जगण्यापेक्षा त्यावर मात करण्यासाठी एका पायाने सायकल चालविण्याचा प्रयत्न ( Two Lakh Kilometer Cycle Journey On One Leg ) केला. सायकल चालविणे ही साधना मानली. आता आपल्याला केवळ दोन वेळचे जेवण मिळाले तरी भरपूर आहे. आपण फक्त सायकल चालवायची असा ठाम निश्चय केला. दिल्ली ते मुंबई ते पुणे मुंबई ते नागपूर असा सायकलवर सुसाट प्रवास करायला मी निघालो असे डॉ. राजू तुर्काने 'ईटीव्ही भारत 'शी बोलताना म्हणाले. सायकल चालविल्याने मी स्वतःशी कनेक्ट होतो अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली.
अशी जिद्द अनेकांसाठी प्रेरणादायी : दुर्धर आजारामुळे एक पाय गमावल्यावर त्याचे दुःख कुरवळत न राहता सायकलीवर स्वार होऊन सुसाट सुटण्याची जिद्द बाळगत चक्क दोन लाख किलोमीटरचा प्रवास त्यांनी गाठला. आज प्रकृती हवी तशी साथ देत नसली तरी भविष्यात काहीतरी चांगलं होईल अशी आशा बाळगणारे डॉ. राजू तुरकाने यांची जिद्द अपयशामुळे व्यथित झालेल्या प्रत्येकासाठी मोठी प्रेरणा देणारे आहेत.