अमरावती - जंगली डुकरांच्या हल्ल्यात दोन हरणांचा मृत्यू झाल्याची संशयास्पद घटना मोर्शी तालुक्यातील कोळविहीर शेतशिवारात घडली आहे. येथील सुभाष गतफने यांच्या शेतजमिनीत दोन हरणे मृत अवस्थेत आढळून आली. त्यानंतर वनविभागाने घटनास्थळी भेट देऊन हरणांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. त्यावेळी डुकरांच्या हल्ल्यात हरणांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वनकर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.
कळपावर डुकरांचा हल्ला-
सध्या रब्बी हंगामातील पिके बहरली आहेत. मोर्शी तालुक्यात सध्या हरभरा पिकांचे मोठ्या क्षेत्रफळावर उपलब्ध आहे. त्यामुळे हरभरा खाण्याकरिता हरणांचे कळप शेतात येतात. तसेच जंगली डुकरांचा देखील या परिसरात मोठ्या प्रमाणात वावर आहे. डुकरे देखील हरभऱ्याचे पीक खाण्याकरीता शेतात येतात. त्यावेळी डुकरांनी हरणांच्या कळपावर हल्ला केला असण्याची शक्यता आहे. या हल्ल्यातच दोन हरणांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.