अमरावती - जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात येणाऱ्या खोडगाव येथून वाहणाऱ्या शहानूर नदीत अंघोळीसाठी उतरलेल्या दोन चुलत भावांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे.
दर्शन सतीश गायगोले ( वय 15) आणि दिवेश दीपक गायगोले(वय 16) असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या चुलत भावांची नावे असून, हे दोघेही अंजनगाव तालुक्यातील धनेगाव येथील रहिवासी आहेत.
सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्याने हे दोघेही खोडगाव येथे दर्शनचे मामा रघुनाथ गावंडे यांच्याकडे आज आले होते. मामांकडे काही वेळ थांबल्यावर हे दोघेही गावालगत वाहणाऱ्या शहानूर नदीत आंघोळीसाठी गेले होते. नदीत उतरताच ते नदीत बुडाले. मुलं नदीत बुडल्याने गावात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अंजनगाव सुर्जी पोलीस खोडगाव येथे पोहचले. गावतील काही युवकांच्या मदतीने या दोघांच्या मृतदेहाचा नदीत शोध घेण्यात आला. काही वेळातच दोघांचाही मृतदेह नदीतून बाहेत काढण्यात आले.