अमरावती - लहान भावाच्या वारंवार दारू पिण्याच्या त्रासाला कंटाळून दोन मोठ्या भावांनीच त्याची निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना अमरावती शहरापासून जवळच असलेल्या पारडी या गावात घडली. आरोपींनी लोखंडी रॉडने हत्या केल्यानंतर युवकाचा मृतदेह अडगाव गावातील एका शेतातील विहिरीत फेकला. प्रफुल भस्मे (वय 25) असे हत्या झालेल्या मृतकाचे नाव आहे.
याप्रकरणी आरोपी योगेश भस्मे व राजेश भस्मे या दोन मोठ्या भावांना लोणी पोलिसांनी अटक केली आहे. हत्या झालेल्या प्रफुल भस्मे याला दारूचे मोठ्या प्रमाणात व्यसन होते. त्यामुळे, घरात रोजच वाद विवाद होत असल्याने आरोपी भावांनी प्रफुलच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्याची निर्घृण हत्या केली.
हत्येनंतर युवकाचा मृतदेह एका पोत्यात टाकून लोणी टाकळी परिसरातील अडगाव शेत शिवारात आणला. हत्या झालेल्या मृतदेहाची ओळख पटू नये, यासाठी तो मृतदेह एका विहिरीत टाकून दिला. दरम्यान, शेतमालक शेतातील विहिरीवर गेला असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे.