अमरावती- एस.टी महामंडळाकडून आज शहर बस स्थानकावरील ८४ बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे, प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एस. टी. महामंडळाच्या बसेसमध्ये फक्त २१ प्रवाशी प्रवास करतील, असे आदेश जारी करण्यात आले. त्यामुळे कमी बसेस असल्याने प्रवाशांनी बसेसमध्ये गर्दी केली, परिणामी त्यांना अक्षरश: खाली उतरवण्याची वेळ बस कर्मचाऱ्यांवर आली.
आज सायंकाळपासून ते २५ मार्चपर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊनचे आदेश जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'जनता कर्फ्यू' पाळण्याचे आवाहन केले आहे. त्यातच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ८४ बसेसच्या फेऱ्या रद्द केल्या. त्यामुळे, उरलेल्या बसेसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू झाली. मात्र, बसेसमध्ये दाटीवाटी झाल्याने प्रवाशांना बसमधून खाली उतरवण्याची वेळ बस कर्मचाऱ्यांवर आली. बसेसच्या फेऱ्या कमी झाल्याने ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शहरात आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली आहे.
हेही वाचा- 'जनता कर्फ्यू'ला सर्वांनी प्रतिसाद द्यावा, ही बंदी नव्हे संधी - नवनीत राणा