अमरावती - अंगावर वीज पडून तिघांचा जागीच मृत्यू तर तीन जखमी झाल्याची घटना अमरावती जिल्ह्यात घडली. अमरावती-अचलपूर मार्गावरील आसेगाव पूर्णा जवळ बुधवारी दुपारी ही घटना घडली.
सोनाली गजानन बोबडे (रा. बोपापूर), शोभा संजय गाठे,(रा. अचलपूर), सैय्यद निजामुद्दीन सैय्यद बदरूद्दीन (रा. अंजनगाव सुर्जी) अशी मृतांची नावे आहेत. दुपारच्या सुमारास पूर्णानगरपासून दोन किमी अंतरावर पाऊस सुरू झाल्याने झाडाखाली पाच ते सहाजणांनी आसरा घेतला. अचानक वीज कोसळल्याने दोन महिलांसह एका पुरुषाचा मृत्यू झाला.
हेही वाचा - अकोल्यामध्ये वीज पडून 4 जणांचा मृत्यू; 4 गंभीर
या घटनेत आपल्या भावासोबत गावी जात असतानाच वीज पडून बहिणीचा मृत्यू झाला आहे. सोनाली गजानन बोबडे असे मृत बहिणीचे नाव आहे. सोनाली यांचा भाऊ स्वप्नील ज्ञानेश्वर वाठ जखमी आहे. भाऊबिजेच्या दुसऱ्याच दिवशी बहिण-भावाची कायमची ताटातूट झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.