अमरावती- आठ दिवसांपूर्वी शहरातील दस्तुरनगर परिसरातील जुन्या मार्गावरील दारूच्या दुकानात चोरी झाली होती. याप्रकरणी आज राजापेठ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून देशी दारूचे ४३ बॉक्स आणि चोरीचा माल नेण्यासाठी वापरण्यात आलेली दोन चारचाकी वाहने, असे एकूण १० लाख ९४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यार आला आहे.
२३ सप्टेंबरला सकळी ८ वाजता करण जयस्वाल यांनी दुकान उघडले असता त्यांना दुकानाच्या मागच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी देशी दारूचे १ लाख ८० हजार रुपये किंमतीचे ८१ बॉक्स चोरून नेल्याचे आढळले. याबाबत त्यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार डी.बी. पथकाने तपास सुरू केला. पथकाने चोरी गेलेल्या दारूसाठ्याची माहिती आपल्या गुप्तहेरांना दिली. त्यानंतर गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हाथीपुरा परिसरातील जवारी उर्फ शाहीद खान (वय 19) याला ताब्यात घेतले. शाहीद खानची कसून चौकशी केल्यावर त्याचा साथीदार अजय भोसले (वय २६ रा. राजुरा बेडा) आणि चोरीचा माल विकत घेणारा मनोज मेश्राम (वय ३० रा. रमाबाई आंबेडकर नगर) यांना ताब्यात घेण्यात आले.
गुन्ह्यातील चोरी गेलेल्या मालपैकी एकूण ४३ देशी दारूचे बॉक्स, गुन्ह्यात वापरलेली २ चारचाकी वाहने, असा एकूण १० लाख ९४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अटक केलेल्या आरोपींनी यापूर्वी गाडगेनगर, वालगाव, आणि भातकुली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणारे देशी दारू व बियरची दुकाने फोडली असल्याची कबुली दिली आहे. अशी माहिती राजापेठ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास भोसले यांनी दिली.
ही कारवाई राजापेठ डी.बी पथकाचे प्रमुख रंगराव जाधव यांच्यासह फिरोज खान, राजेश गुरेले, अशोक वाटणे, सुनील लासूरकर आदींनी केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दत्त नरवडे करीत आहे. शहरात घरफोडी, चोऱ्यांचे प्रमाण वाढले असताना बऱ्याच दिवसानंतर पोलिसांना चोरट्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे.
हेही वाचा- अमरावती: महापौरांच्या गाडीला अपघात