अमरावती - शरातील माधवनगर मध्ये राहणाऱ्या एका सोनाराच्या घरात चोरी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. चोरांनी सोनार व त्याच्या पत्नीला चाकूमारून सोनाराच्या घरातील ३ लाख ९२ हजार रुपयांचे दागिने व ४ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ३ लाख ९६ हजारांचा ऐवज चोरून नेला. चोरी करून जाताना चोरट्यांनी हवेत गोळीबारही केला.
पंधरा मिनिटात केली चोरी -
माधव नगरमध्ये राहणाऱ्या प्रदीप माथने यांच्या घरी शनिवारी रात्री दोन चोरटे शिरले. त्यांनी सोनाराची पत्नी शुभांगी माथने यांना चाकूचा धाक दाखवत घरातील सर्व दागिने लुटले. याच दरम्यान प्रदीप माथने हे घरी आले. त्यांनी चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र, चोरट्यांनी त्यांना चाकू मारून जखमी केले. चोरीचा हा थरार पंधरा मिनिटे सुरू होता. त्यानंतर परिसरातील मुख्य चौकात येऊन चोरट्यांनी हवेत गोळीबार केला व रस्त्याने येणाऱ्या नंदू वामनराव कुटे या दुचाकीस्वाराला दगड मारून जखमी केले. त्यानंतर कुटे यांची दुचाकी घेऊन चोरटे पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी घटनास्थळला भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
दोन दिवसांपूर्वीच लातूरच्या उदगीरमध्येही अशीच घटना घडली होती. चोरट्यांनी उदगीर शहरालगत असलेल्या बनशेळकी तलावाजवळ राहणाऱ्या वयोवृद्ध दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून लुटले होते. औसा तालुक्यातील एका शिक्षकाच्या घरी देखील जबरी चोरी झाली होती. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसते आहे.
हेही वाचा - लातूर जिल्ह्यात चोरीचे सत्र सुरूच; चाकूचा धाक दाखवून उदगीरमध्ये वयोवृद्ध दाम्पत्यास लुटले