अमरावती - अमरावती ते कौंडण्यपूर या रस्त्याचे बांधकाम या दरम्यान मार्डी गावालगत रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहणाऱ्या नाल्यापैकी एका बाजूचा नाला बुजवण्यात आला आहे. तर, दुसऱ्या बाजूच्या नाल्याने वाहणारे पाणी नदीत जाण्याऐवजी एका शेतकऱ्याच्या शेतात शिरले. अतिवृष्टीमुळे आधीच बेजार झालेल्या शेतकऱ्याच्या शेतात नाल्याचे पाणी शिरल्याने संपूर्ण शेत पाण्याखाली आले आहे. शासनाच्या चुकीमुळे शेत वाहून गेले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातही आता पाणी आले आहे.
असा आहे संपूर्ण प्रकार
अमरावती ते कौंडण्यपूर रस्त्याचे काम रवी इन्फ्रा या कंपनीच्या वतीने करण्यात आले. हा रस्ता तयार करत असताना मार्डी गावालगत रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहणारा नाला एका बाजूने बुजवण्यात आला आहे. दोन्ही दिशेने वाहणारे पाणी एकाच भागाने वाहणाऱ्या नाल्यातून काढण्यात आले. मार्डी गावसाह लगतच्या परिसरातील अनेक छोट्यामोठ्या गावातील सांडपाणी या नाल्यातून वाहून पुढे नदीत जाते. मात्र, गत दोन वर्षांपासून या नाल्याचे पाणी येथील शेतकरी नीरज डाफ यांच्या शेतात शिरत आहे. अतिवृष्टीमुळे डाफ यांनी शेताला बांधलेले कुंपण तोडून नाल्यातील पाणी त्यांच्या शेतात शिरले. ऑगस्ट महिन्यात सर्वात आधी असा प्रकार घडला असताना, डाफ यांनी याबाबत जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह रवी इन्फ्रा कंपनीच्या अधिकार्यांकडे तक्रार केली होती. मात्र, त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नसल्यामुळे त्यांनी स्वतः या नाल्यात स्वखर्चाने दोन पाईप टाकून शेतात पाणी जाणार नाही अशी व्यवस्था केली. मात्र, शनिवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याचे पाणी नदीच्या दिशेने न वाहता संपूर्ण पाणी डाफ यांच्या शेतात शिरले. डाफ यांनी नव्याने उभारलेले कुंपण आणि फाटक तोडून या पाण्याने यांच्या शेतातील कापूस, मिरची या पिकांचे नुकसान केले आहे.
न्याय मागायचा तरी कोणाकडे
मार्डी येथे गत पंचवीस वर्षापासून असणाऱ्या या शेतीद्वारे आमच्या कुटुंबाचे पालन-पोषण होत आले आहे. आमची काहीएक चूक नसताना आमच्या शेतात नाल्याचे पाणी शिरत आहे. रवी इन्फ्रा कंपनीची ही चूक आहे त्या कंपनीच्या प्रतिनिधींकडे अनेकदा तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. हे आमचे कामच नाही असे उत्तर त्यांच्याकडून मिळत आहे. पालकमंत्र्यांकडेही तक्रार देऊन सुद्धा आमची समस्या कायम आहे. आता आम्ही न्याय मागायचा तरी कोणाकडे असा प्रश्न उपस्थित करीत आम्ही आत्मदहन करावे का असा सवाल नीरज डाफ या शेतकऱ्याने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना शासनाला केला आहे.
हेही वाचा - स्वातंत्र्याची 75 वर्षे : स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाच्या घडामोडींचे साक्षीदार राहिलेले "सेवाग्राम आश्रम"