अमरावती - निवडणुकांची लगबग प्रत्येक नागरिकाने अनुभवलेली असते. मात्र, लहान मुले त्या अनुभवापासून दूरच राहतात. ही निवडणूक प्रक्रिया नेमकी असते तरी कशी, हे मुलांनी अनुभवावे यासाठी मोझरी येथील महात्मा फुले बहुद्देशीय संस्था संचालित ओम कोचिंग क्लासेसने एक अनोखा उपक्रम रावबला आहे. वर्ग प्रतिनिधी निवडण्यासाठी या क्लासेसमध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडते.
निवडणुकीदरम्यान, प्रत्येक उमेदवाराला लोकशाही प्रक्रियेला सामोरे जाऊनच पद मिळवता येते. उमेदवार नामांकन अर्ज भरतात. अर्जांची पडताळणी होते. प्रत्येक उमेदवाराला चिन्ह वाटप केले जाते. उमेदवाराला प्रचारासाठी वेळही दिला जातो. शेवटी बॅलेट पेपरच्या साहाय्याने आचारसंहितेत मतदान पार पडते. मुलांना राजकारण आणि निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती व्हावी म्हणून हा उपक्रम हाती घेतल्याचे, क्लासेसचे संचालक सुशील निमकर सांगतात.
हेही वाचा - अमरावतीच्या कनिष्ठ न्यायालयात लिपीक आईचा मुलगा झाला न्यायाधीश
निवडणुकीची सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर मतमोजणी होते. विजयी उमेदवाराला विजयी घोषित करून प्रमाणपत्र देण्यात येते. विजयी उमेदवाराच्या विजयाचा जल्लोषही केला जातो. ओम कोचिंग क्लासेसने राबवलेल्या उपक्रमाचे सगळीकडे कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांमध्येही या संपूर्ण प्रक्रियेबाबत प्रचंड उत्साह पाहायला मिळतो.