अमरावती: बुधवारी दुपारी अचानक वादळ आले. वादळ जोरात असल्याने वैभव मंगल कार्यालयावरील टिनपत्राचे शेड उडाले आणि लग्नसोहळ्यात येऊन पडल्याने 50 पेक्षा जास्त जखमी झाले असून त्यातील जवळपास पाच ते सहा गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. जखमींना खासगी दवाखान्यात व ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तसेच मंगल कार्यालयाच्या समोर उभ्या असणार्या दुचाकी व चारचाकी वाहनांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मुर्तीजापूर रोड स्थित वैभव मंगल कार्यालयात अंजनगाव बारी येथील अंभोरे परिवार यांच्याकडील लग्नसोहळा होता. या लग्न सोहळ्यात शेकडो लोक उपस्थित होते. दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान या लग्न सोहळ्याच्या जेवणावळी सुरू होत्या. दरम्यान दर्यापूर मध्ये आलेल्या वेगवान वार्याने व पावसाने धुमाकूळ घालत या मंगल कार्यालयावर टिनपत्राचे शेड उडाले.
कार्यालयाच्या भिंतीच्या विटा सुद्धा काही उपस्थित लोकांच्या अंगावर पडल्या. सदर टिनपत्रे उडून कार्यालयतच पडल्याने सर्वत्र धावपळ सुरू झाली. नागरिक जिकडे वाट मिळेल तिकडे धावत होते. काही वेळानंतर वारे शांत झाल्याने व पाऊस थांबल्याने जखमींना प्रथमोपचार देण्यात आले. गंभीर जखमींना दर्यापूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.